निवडणूक जिल्हा बँकेची; चर्चा विधानसभेची | पुढारी

निवडणूक जिल्हा बँकेची; चर्चा विधानसभेची

मिरज : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा बँक निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती गटातून राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी प्रचंड मतांनी विजय मिळविला. त्यांच्या विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.

यावेळी जयंत पाटील व राष्ट्रवादीच्या घोषणा देत रॅली काढली. रॅलीमध्ये “जिल्हा बँक तो झॉकी है, मिरज विधानसभा बाकी है” “मिरजेत आता एकच सूत्र, आपला भावी आमदार भूमिपुत्र” “ऐतिहासिक मिरजेला हवा, विकासाचा वेग नवा. नको आता जुमलेबाजी, कामाचा माणूस हवा. हाय फाय नको, साधा हवा, बाळासाहेब आमचा आमदार व्हावा”. “शेतकर्‍यांच्या विकासाचे सूत्र, जिल्हा बँकेत निवडून आला मिरजेचा भूमिपुत्र” असे फलक झळकत होते.

यावेळी होनमोरे म्हणाले, गेल्या पाच वर्षांत केलेल्या जिल्हा बँकेतील कामाची पोहोचपावती म्हणून पालकमंत्री जयंत पाटील यांनी मला पुन्हा उमेदवारी दिली. आज पुन्हा मी भरघोस मताने विजय झालो आहे. आमची सहकार विकास आघाडी आहे. आम्ही सर्वजण एक विचाराने काम करू. पण, मिरज तालुक्यात राष्ट्रवादीचा मी एकमेव सदस्य बँकेत जात आहे. माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी मी आग्रही राहणार आहे.

ते म्हणाले, मिरज विधानसभा मतदारसंघ विकासापासून वंचित आहे. त्यामध्ये एखादा मोठा व्यवसाय, दोन हजार युवकांना हाताला काम, चांगले रस्ते, यासाठी मी प्राधान्याने शासनस्तरावर प्रयत्न करणार आहे. शेतकर्‍यांच्या सातबार्‍यावर चुकीच्या नोंदी यामुळे कर्ज वितरण करण्यात अडथळे येत आहेत . त्याबाबत योग्य त्या सुचना सोसायटीचे सचिव आणि बँक इन्स्पेक्टर यांना दिल्या जातील, असेही ते म्‍हणाले.

ना. जयंत पाटील व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज शिंदे यांनी मला पुन्हा बँकेत काम करण्याची संधी दिली आहे. या संधीचा उपयोग जास्तीत जास्त शेतकर्‍यांसाठी व 12 बलुतेदारांसाठी करून जिल्हा बँकेच्या माध्यमातून तळागाळातील व वंचित लोकांना उद्योग व व्यवसायासाठी मदत करणार आहे. मिळालेल्या संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलं का?

Back to top button