सांगली : शिकवायचं कधी अन् सर्व्हे करायचा कसा? शिक्षकांतून सवाल | पुढारी

सांगली : शिकवायचं कधी अन् सर्व्हे करायचा कसा? शिक्षकांतून सवाल

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण जिल्ह्यात बुधवारपासून (दि. 24) सुरू होत आहे. त्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, कृषी सहायक यांची नियुक्ती केली आहे. मात्र शिक्षकांना सातत्याने अनेक कामे लावण्यात येत आहेत. अशातच हा सर्व्हे करायचा कधी आणि शिकवाचे कधी, असा सवाल शिक्षकांतून उपस्थित होत आहे.

सर्व्हेसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे आठ दिवसांत हा सर्व्हे पूर्ण करावाच लागणार आहे. प्रत्येकास किमान 100 कुटुंबांची जबाबदारी दिली आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे करायचा आहे. या सर्व्हेसाठी सुमारे 181 प्रश्न तयार केले आहेत. त्यामध्ये मूलभूत, आर्थिक, पीक लागवड, उत्पन्नस्रोत, मालमत्ता स्वामित्व, कुटुंबाची सामाजिक माहिती आदी प्रश्न आहेत. मुला-मुलींचे लग्नाचे वय शासनाने निश्चित केले आहे. तसेच हुंडा देण्यासही निर्बंध घातला आहे. तरीही हे प्रश्न या सर्व्हेत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील शिक्षकांना अधूनमधून विविध प्रकारच्या सर्व्हेची जबाबदारी दिली जाते. त्यामुळे शिकवणीवर निर्बध येतात. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांनाही कामाचा ताण आहे. अनेक ठिकाणी दोन गावांचा एका कर्मचार्‍यावर भार आहे. त्यामुळे सर्वेक्षणाचा ताण कमी करण्यासाठी माध्यमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक, प्राध्यापक यांच्यावरही सर्व्हेची जबाबदारी देण्यात मागणी होत आहे. परिणामी सर्व्हे जलद होण्यासही मदत होईल. तसेच सुशिक्षित बेरोजगार यांनाही मानधन देऊन सर्व्हेत घेण्याची मागणी होत आहे.

सर्व्हेमध्ये असे आहेत प्रश्न…

तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची अनुमती आहे का, विधवा स्त्रिया औक्षण करू शकतात का, विधुर पुरुष आणि विधवांचे पुनर्विवाह होतात का, विधवांना धार्मिक कार्य, पूजा करू दिली जाते का, विवाहितांना डोक्यावर पदर घेण्याचे बंधन आहे का, जागरण गोंधळ व अन्य धार्मिक विधींसाठी किंवा नवसासाठी कोंबडा, बकर्‍याचा बळी देण्याची पद्धत आहे का, कुटुंबातील आजारी सदस्याला लवकर आराम न पडल्यास द़ृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे असे प्रकार केले जातात का, असे एकूण 181 प्रश्न आहेत.

ऑनलाईन भरली जाणार माहिती

हे सर्वेक्षण मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून होणार आहे. दिलेल्या कुटुंबाच्या घरी जाऊन जीपीएस लोकेशनच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड, सही अ‍ॅप्लिकेशनवर घ्यावी लागणार आहे. तसेच या अ‍ॅप्लिकेशनमध्ये संपूर्ण प्रश्नावली भरावी लागणार आहे. सर्व माहिती ऑनलाईन भरावी लागणार आहे. त्यामुळे एका कुटुंबास किमान अर्ध्या तासाहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. तसेच ही प्रक्रिया ऑनलाईन असल्याने रेंजची अडचण येऊ शकते.

अगोदरच शिक्षकांना अनेक अवांतर कामे दिली आहेत. त्यामुळे सर्व्हे करायचा कधी आणि शिकवायचे कधी? या सर्व्हेसाठी माध्यमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक, प्राध्यापकांची नियुक्ती करावी.
– अविनाश गुरव सरचिटणीस, शिक्षक संघ

Back to top button