लोकसभेसाठी एकसंध राहू; सांगलीत महायुती घटक पक्षांच्या मेळाव्यात नेत्यांचा निर्धार

Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काम केले. त्यामुळे मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी मतभेद, अडचणी किमान लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत बाजूला ठेवू, ही निवडणूक एकसंधपणे लढू, असा निर्धार सांगलीत रविवारी झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आला.

सांगलीत खरे क्लब येथे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), जनसुराज्य शक्ती, रयत क्रांती संघटना, रिपाइं (आठवले गट), पीआरपी (कवाडे गट), भीमसेना, प्रहार जनशक्ती यांसह एकूण 16 घटक पक्षांच्या महायुतीचा मेळावा झाला.
यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आ. अनिल बाबर, आ. गोपीचंद पडळकर, माजी आ. विलासराव जगताप, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार
दिनकर पाटील, माजी आ. नितीन शिंदे, स्वाती शिंदे, गीतांजली ढोपे-पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील उपस्थित होते.

खा. पाटील म्हणाले, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून विस्तारित म्हैसाळ योजनेसाठी दोन हजार कोटी मिळाले. एक हजार कोटीच्या कामाचे टेंडर निघून काम सुरू झाले. तसेच टेंभू योजनेच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली. सौर ऊर्जा प्रकल्पासाठी चौदाशे कोटी मिळाले.

चूक होणार नाही, झाली तर दुरुस्त करू : आ. बाबर

आमदार बाबर म्हणाले, सध्या निवडणुकीला पोषक वातावरण आहे. मोदींनी देशात, राज्यात भरपूर विकास केला. ही कामे लोकापर्यंत पोहोचविणे आपली जबाबदारी आहे. 2014 पासून एकत्रित काम करीत आहे. याकाळात अनेकवेळा परीक्षा देण्याची वेळ आली. मात्र भाजप सोबत राहिलो. येणार्‍या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाकडून कोणतीही चूक होणार नाही. कुठे चूक होत असेल तर सांगा ती दुरूस्त करू. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने 2014 मध्ये त्यांना पंतप्रधान केले. त्यानंतर गेल्या दहा वर्षात सामान्य माणूस देशाशी जोडला गेला. घटक पक्षाला काही मिळाले नाही तरी आपले प्रश्न देशासमोर छोटे आहेत. देशाच्या सन्मानासाठी ही लढाई लढायची आहे. पृथ्वीराज देशमुख म्हणाले, घटक पक्षांनी काही चूक झाल्यास सांगावे. ती दुरुस्त करून घेऊ. घटक पक्षांची समन्वय समितीकरून महिन्याला बैठक घेऊ आणि चर्चा करू. मनात शंका कुशंका न बाळगता एकसंधपणे लढायचे आहे.

वैभव पाटील यांची नाराजी

राष्ट्रवादी (अजित दादागट) जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच कार्यक्रमात बसण्यासाठी व्यवस्थित खुर्चीही मिळाली नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ते म्हणाले, आम्ही महायुतीत लेट आलो, पण थेट आलो हे लक्षात घ्या. त्यामुळे युतीचे आमच्यावर लक्ष असूदे. लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सर्वांनी अडचणी, मतभेद बाजूला ठेवा. मनापासून एकत्रित काम करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news