सांगली : ‘सोनहिरा’ कारखान्याकडून ३,१७५ रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : मोहनराव कदम | पुढारी

सांगली : 'सोनहिरा' कारखान्याकडून ३,१७५ रुपये पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : मोहनराव कदम

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा : डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 गळीत हंगामात गळीतास आलेल्या उसाला प्रती टन 3 हजार 175 रुपये प्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

यावेळी बोलताना आमदार मोहनराव कदम म्हणाले, 1 ते 15 डिसेंबर अखेर 1 लाख 16 हजार टन उसाचे 36 कोटी 83 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 1 ते 30 नोव्हेंबर 2023 अखेर कारखान्यास गाळपास आलेल्या 1 लाख 78 हजार टन उसाचे प्रती टन 3 हजार 100 प्रमाणे 55 कोटी 21 लाख रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. उर्वरित 75 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

ते पुढे म्हणाले की, कारखान्याचे आजअखेर 4 लाख 5 हजार 960 टन उसाचे गाळप झाले आहे. 3 लाख 56 हजार 170 साखर पोत्यांचे उत्पन्न घेतले आहे. तसेच कारखान्याचे उपपदार्थ प्रकल्प को-जनरेशन व डिस्टीलरी पूर्ण क्षमतेने सुरु आहेत. शेतकऱ्यांनी कारखान्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे कारखान्याने उत्तम प्रगती केली आहे. तरी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी कारखान्यास पाठवावा. यावेळी कार्यकारी संचालक शरद कदम व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button