कोल्हापूर-पुणे स्पेशलसह सर्व डेमू रेल्वे रद्द | पुढारी

कोल्हापूर-पुणे स्पेशलसह सर्व डेमू रेल्वे रद्द

मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज-पुणे आणि मिरज-बेळगाव रेल्वेमार्गावर 26 डिसेंबर ते 12 जानेवारीदरम्यान इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे, बेळगाव आणि कुर्डूवाडी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. परिणामी, या मार्गावर धावणारी कोल्हापूर-पुणे स्पेशलसह सर्व डेमू गाड्या रद्द केल्या आहेत. राणी चन्नम्मा एक्स्प्रेस बेळगावपर्यंत, लोंढा व कॅसलरॉक एक्स्प्रेस घटप्रभापर्यंतच धावतील. अन्य लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग वळविले आहेत.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गावर दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे तसेच इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 19 दिवस मेगाब्लॉक असेल. यामुळे कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर स्पेशल एक्स्प्रेसह पुणे, बेळगाव आणि कुर्डूवाडी मार्गावर धावणार्‍या सर्व डेमू रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच मिरज-लोंढा व मिरज-कॅसलरॉक धावणार्‍या गाड्या या घटप्रभापर्यंत, तर बंगळूर-मिरज येणारी राणी चन्नम्मा एक्स्प्रेस बेळगावपर्यंतच धावेल.

26 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत धावणार्‍या बंगळूर ते अजमेर, जोधपूर, गांधीधाम या गाड्यांचे मार्ग वळविले आहेत. धनबाद-कोल्हापूर व नागपूर-कोल्हापूर व्हाया पंढरपूर येणार्‍या साप्ताहिक गाड्या पंढरपूरपर्यंतच येतील व पंढरपूर येथूनच परतीच्या प्रवासासाठी धावतील.

मिरजेजवळील रेल्वे पूल करणार सहापदरी

सांगली : कृपामयीजवळील रेल्वे पूल सहापदरी करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांनी दिली.

Back to top button