सांगली : तासगाव तालुक्यात ६८ गावात कामबंद आंदोलन | पुढारी

सांगली : तासगाव तालुक्यात ६८ गावात कामबंद आंदोलन

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात ६८ ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, संगणक परिचालक, ग्राम रोजगार सेवक आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सोमवार (दि १८) ते बुधवार (दि.२०) पर्यंत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाले आहे. महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे ज्येष्ठ नेते प्रदीप भाने आणि तुरची ग्रामपंचायतीचे सरपंच विकास डावरे यांच्या नेतृत्वाखाली हे काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक हे गेल्या अनेक दिवसांपासून संपावर आहेत. अशात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांनी संपाचे हत्यार उगारले असून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व कर्मचा-यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. सोमवारी ६८ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, ग्राम रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गट विकास अधिकारी अविनाश मोहिते यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात अखिल भारतीय सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघ, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद कामगार संघटना, महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटना, ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती यांचा सहभाग होता.

हेही वाचा :

Back to top button