मिरजेत सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी | पुढारी

मिरजेत सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी

मिरज; पुढारी वृत्तसेवा : येथील किल्ला भागात एका सराईत गुन्हेगारास पकडण्यासाठी आलेल्या अकोला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाच्या हातावर तुरी देत लोकेश सुतार (वय 40, रा. लिंगनूर, ता. मिरज) याने पलायन केले. पलायन करीत असताना लोकेश याच्या कारचा भीषण अपघात झाला.

मिरज तालुक्यातील लोकेश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्रासह कर्नाटक आणि मध्य प्रदेशमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी अकोल्यात घरफोडीचा प्रकार घडला होता. लोकेशने ही घरफोडी केल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली होती. अकोला पोलिस त्याच्या मागावर होते. तो मिरजेतील न्यायालयाजवळ येणार असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाली. अकोला पोलिसांनी मिरज किल्ला भागात न्यायालयाबाहेर सापळा लावला होता.

तो न्यायालयाजवळ उभ्या केलेल्या त्याच्या कारजवळ आला असता, अकोला पोलिसांची नजर त्याच्यावर पडली. याचवेळी पोलिस दिसताच त्याने कारमध्ये बसून कार भरधाव वेगाने पळवली. तो मिळेल त्या मार्गाने कार जाऊ लागला. एका अरुंद असणार्‍या गल्लीमध्ये त्याची कार अडकली. त्यामुळे तो कार घटनास्थळी सोडून अकोला पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झाला. अकोला पोलिसांचे पथक मिरजेत तळ ठोकून असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

मिरज पोलिसांना माहितीच नव्हती

लोकेश हा मिरज न्यायालयाजवळ येणार असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळाल्याने त्यांनी मिरज शहर पोलिसांना याबाबत कल्पना न देताच त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला. परंतु अकोला पोलिसांना मिरजेतील रस्तेच माहीत नसल्याने तो पसार होण्यात यशस्वी झाला.

मुंबई, नागपूर आणि उंब्रज पोलिसांचा देखील यापूर्वी छापा

विविध गुन्ह्यांत लोकेश सुतार याला अटक करण्यासाठी यापूर्वी मुंबई, नागपूर आणि उंब्रज पोलिसांनी देखील मिरज तालुक्यातील लिंगनूरमध्ये छापेमारी केली होती. परंतु लोकेश हा त्यांच्यादेखील हाती लागला नव्हता.

Back to top button