सांगली : ‘सुबोधसिंग’ टोळीला ‘मोक्का’ लागणार! | पुढारी

सांगली : ‘सुबोधसिंग’ टोळीला ‘मोक्का’ लागणार!

सचिन लाड

सांगली : येथील रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर तुरुंगात बसून साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा टाकून 15 कोटीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याप्रकरणी सुबोधसिंग टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. सुबोधसिंगवर देशभरातील विविध राज्यांत दरोड्याचे तब्बल 34 गुन्हे दाखल आहेत.

पिस्तूलाच्या धाकाने दहशत

सांगली-मिरज रस्त्यावर मार्केट यार्डजवळ रिलायन्स ज्वेल्स सराफी पेढी आहे. दि. 4 जूनला टोळीने पिस्तूलाच्या धाकाने दहशत माजवित दरोडा टाकला. सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी केली. कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधून सुमारे 15 कोटीचे सोन्याचे दागिने व रोकड लुटली होती.

पथक महिनाभर बिहारमध्ये

भरदिवसा घडलेल्या या घटनेने खळबळ माजली होती. टोळीतील साथीदार पेढीतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीत झाले होते. त्यामुळे त्यांची नावे निष्पन्न करण्यात यश आले. बिहारमधील अट्टल दरोडेखोर सुबोधिसिंग याने साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले होते. साथीदारांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण व विश्रामबाग पोलिसांची पथके तब्बल एक-एक महिनाभर बिहारमध्ये तळ ठोकून होती. गेल्या महिन्यात एका साथीदाराला पकडण्यात यश आले होते.

सातजणांची नावे निष्पन्न

सुबोधसिंग बिहारमधील पटणा कारागृहात गेल्या सहा वर्षापासून होता. गेल्या आठवड्यात न्यायालयाच्या आदेशाने त्याचा ताबा घेण्यात सांगली पोलिसांना यश आले होते. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. चार दिवसांपूर्वी त्याच्या साथीदाराला अटक केली. आतापर्यंत सुबोधसिंगसह सातजणांची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील तिघेजण अटकेत आहेत.

देशभरात गुन्हे दाखल

सुबोधसिंग ईश्वरप्रसाद सिंग (वय 28, नालंदा, बिहार) टोळीविरुद्ध देशभरातील विविध राज्यांत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली जात आहे. गणेश उद्धव बद्रेवर (24, हैदराबाद), प्रिन्स कुमार सिंगप्रताप अशोकसिंग राणा (25, वैशाली, बिहार), कार्तिक नंदलाल मुजुमदार (23, हुगळी, पश्चिम बंगाल), अंकुरप्रताप रामकुमार सिंग (25, तारवान, बिहार), महम्मद शमशाद मुख्तार (23, चेरिया, बिहार) हे सात जण ‘रडार’वर आले आहेत.

‘मोक्का’च्या हालचाली

टोळी अत्यंत घातक आहे. प्रत्येक गुन्ह्यात सातत्याने वेगवेगळे साथीदार घेऊन सुबोधसिंगने दरोडे टाकले. सांगलीतील दरोड्यात सातजणांचा सहभाग होता. या सातजणांना ‘मोक्का’ लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविला जाणार आहे.

तपासाची व्याप्ती वाढली… बिहारच ‘कनेक्शन’

दरोड्याच्या तपासाची व्याप्ती वाढली आहे. सातत्याने पोलिसांना बिहार‘वारी’ करावी लागत आहे. अजूनही चार साथीदारांना अटक करायची आहे. त्यांच्या मालमत्तांची चौकशी केली जाणार आहे. तीन साथीदार पकडल्याची कुणकूण लागल्याने अन्य चौघे पसार झाले आहे.

Back to top button