सांगली : कोयनेतील विसर्ग पुन्हा थांबणार | पुढारी

सांगली : कोयनेतील विसर्ग पुन्हा थांबणार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी गुरुवार, दि. 7 पासून पुन्हा थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे ताकारी, टेंभू योजना सुरू राहण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. कोयना धरणातून विसर्ग कायम सुरू ठेवावा, अशी मागणी सांगली पाटबंधारे विभागाने सातारा पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

पावसाचे प्रमाण यंदा कमी आहे. त्याशिवाय कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. पिण्यासाठी व पिके जगवण्यासाठी पाण्याची मागणी वाढली आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी वेळोवेळी थांबवण्यात येत आहे. सांगली पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची मागणी करूनही सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वेळेवर पाणी सोडले नाही. यातून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पाणी सोडण्याबाबतचा विषय गेला. त्यानंतर कालवा समितीची बैठक घेऊन सांगलीच्या वाट्याचे पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानंतरही पालकमंत्री देसाई यांच्या भूमिकेमुळे मागणी करूनही पाणी सोडले नाही. त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय गेल्यानंतर काही दिवसांपूर्वी पाणी सोडले. त्यावर खासदार संजय पाटील यांनी पालकमंत्री देसाई व आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका करीत, प्रसंगी खासदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा दिला.

अधिकार्‍यांचा आशावाद

याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पाणी गुरुवारपासून बंद करण्यात येणार असल्याचे पत्र आम्हाला मिळाल्यानंतर कोयना धरणातून कृष्णा नदीत होणारा विसर्ग कायम सुरू ठेवावा, अशी मागणी आम्ही केली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाट्याचे नोव्हेंबरचे व या महिन्यातील पाणी कोयना धरणात शिल्लक आहे. त्यामुळे पाणी योजना सुरू राहील, हा अधिकार्‍यांचा आशावाद आहे. पाणी सोडले नाही, तर या आशावादावर पाणी सोडावे लागणार.

वाट्याचे पाणी शिल्लक असतानाही नकारघंटा

नोव्हेंबरचे सांगली जिल्ह्याच्या वाट्याचे दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्याशिवाय डिसेंबरचे पाणी अजून बाकी आहे. तरीसुद्धा कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी गुरुवारपासून थांबविण्यात येणार असल्याची माहिती सांगली पाटबंधारे विभागाला दिली आहे. त्यामुळे ताकारी, टेंभू सिंचन योजना कशी सुरू करायची, असा प्रश्न अधिकार्‍यांसमोर आहे.

Back to top button