सांगली : सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये बॉयलरच्या स्फोटात एकाचा मृत्यू | पुढारी

सांगली : सावळीत कोल्ड स्टोअरेजमध्ये बॉयलरच्या स्फोटात एकाचा मृत्यू

कुपवाड;  पुढारी वृत्तसेवा : सावळी (ता. मिरज) येथील तानंग रस्त्यालगत असलेल्या श्रीनिधी ग्रो प्रोसेसिंग अ‍ॅन्ड कोल्ड स्टोअरेजमधील बॉयलरच्या स्फोटात नातूसिंग ग्यानसिंग भदोडिया (वय 58, रा. मूळगाव बिहार, सध्या रा. सावळी) या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. बॉयलरच्या स्फोटाने दोन किलोमीटर पर्यंतचा परिसर हादरला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : सावळी-तानंग रस्त्यालगत असलेल्या श्रीनिधी ग्रो प्रोसेसिंग अ‍ॅन्ड कोल्ड स्टोअरेजमध्ये रविवारी दुपारी अचानक बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात बॉयलर कामगार नातूसिंग भदोडिया हा गंभीर जखमी झाला. स्फोटात बॉयलरचे संपूर्ण शेड जमीनदोस्त झाले. स्फोटाने शेडवरील पत्रे लांब उडून गेले. कोल्ड स्टोअरेजमधील काचेच्या खिडक्या, पत्रे, दरवाजे आदींचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटात गंभीर जखमी झालेला परप्रांतीय कामगार हा ठेकेदारामार्फत काम करीत असल्याचे कामगारांनी सांगितले. सदरचा कामगार हा कोल्ड स्टोअरेजमधील एका खोलीत राहत होता. जखमीस काही कामगारांनी तातडीने सांगलीतील एका दवाखान्यात दाखल केले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना काही तासांतच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे पोलिस पथकासह घटनास्थळी तातडीने दाखल झाले. घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे.

Back to top button