सांगली : नव्या जागेत पोलिस मुख्यालयाचे स्थलांतर!

सांगली : नव्या जागेत पोलिस मुख्यालयाचे स्थलांतर!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील पोलिस मुख्यालयाचे नवीन इमारतीमध्ये सोमवारी स्थलांतर केले जाणार आहे. पाच महिन्यांपूर्वी इमारत उभी झाली आहे. गृहमंत्रालयाची परवानगी आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

विश्रामबाग येथे 1976 मध्ये पोलिस मुख्यालयाची इमारत उभी केली होती. त्याला आता साडेपाच दशके पूर्ण झाली आहेत. दगडी बांधकाम असलेली ही इमारत अजूनही मजबूत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विभागांसाठी ही जुनी इमारत कमी पडू लागली. यासाठी शासनाने नवीन मुख्यालय बांधण्यास प्रशासकीय मान्यता दिली. वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार नवीन इमारत बांधण्यात आली. अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी ही इमारत आहे.

महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील पोलिस ठाणी या मुख्यालयास जोडली जाणार आहेत. त्यामुळे जिल्हा पोलिसप्रमुखांना तत्काळ कोणत्याही पोलिस ठाण्याशी संपर्क साधता येणार आहे. पाच महिन्यांपूर्वीच ही इमारत बांधून तयार आहे. पण उद्घाटनाची तारीख गृहखात्याकडून अजून दिलेली नाही. आणखी किती दिवस ही इमारत तशीच मोकळी ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाल्याने उद्या (सोमवार) जुन्या मुख्यालयाचे येथे स्थलांतर केले जाणार आहे. त्यामुळे उद्घाटनाचा सोहळा लांबणीवर पडला आहे.

जिल्हा पोलिसप्रमुखांचा कक्ष, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख, पोलिस उपअधीक्षक (गृह), कॉन्फरन्स हॉल, सायबर विभाग, महिला सहाय्यक विभाग सुरक्षा शाखा, पासपोर्ट विभाग, पोलिस कल्याण शाखा, जिल्हा विशेष शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सीसीटीव्ही कक्ष तसेच कॅन्टीन या सुविधा असणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news