सांगली : हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने रात्रीत हिरावला | पुढारी

सांगली : हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळीने रात्रीत हिरावला

वैभव केंगार

कवठेमहांकाळ :  मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे कुची (ता. कवठेमहांकाळ) येथील सूरज दत्तात्रय पाटील यांच्या दीड एकर द्राक्षबागेत घडाचे मणी क्रॅकिंग होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. पाटील यांनी 320 रुपयांना द्राक्षबाग व्यापाराला ठरवलेली होती. दुसर्‍या दिवशी द्राक्षे काढणार होते. मात्र अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला.

कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान व द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे. शेतकर्‍यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वार्‍यामुळे शाळू, कांदे, पालेभाज्या, फळभाज्या भुईसपाट होऊन शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

कुची येथील विनोद तुकाराम पाटील यांच्या एक एकर द्राक्षबागेत मणी क्रॅकिंग होऊन नुकसान झाले. सचिन पाटील यांच्या बागेचेही नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.

Back to top button