मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास १ कोटी लोक देश सोडतील : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर | पुढारी

मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास १ कोटी लोक देश सोडतील : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सरकार आणि व्यापार्‍यांनी संगनमत करून टोमॅटोचा तुटवडा निर्माण करून देशवासियांची 35 हजार कोटी रुपयांची लूट केली. कबाब, शबाब आणि पैशाचा वापर करून पुन्हा सत्तेवर येणे आणि पुन्हा देश लुटणे हा मोदींचा इरादा आहे. हिंदू राष्ट्र करायच्या नावाखाली लुटमार सुरू आहे. लुटारुंचे हे सरकार पुन्हा सत्तेवर ठेवणार का, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियममध्ये वंचित बहूजन आघाडीची ‘सत्ता संपादन निर्धार सभा’ झाली. वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, दिशा पिंकी शेख, राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ, डॉ. क्रांती सावंत, जयसिंग शेंडगे प्रमुख उपस्थित होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, दोन-तीन महिन्यानंतर लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने ‘इलेक्शन फंड’ उभारला आहे. व्यापार्‍यांशी संगनमत करून टोमॅटोचा तुटवडा निर्माण केला आणि महिना-दीड महिन्यात जनतेची 35 हजार कोटींची लूटमार केली. हाच पैसा निवडणुकीत वापरून पुन्हा जनतेला लुटायला ते मोकळे झाले आहेत. लुटारुंच्या सरकारला जनतेने या निवडणूक हद्दपार करावे. मोदी हे ठोकशाहीचे आहेत, लोकशाहीचे नाहीत. दहा वर्षांत ते एकदाही पत्रकार परिषदेला सामोरे गेले नाहीत. ते भित्रे प्रधानमंत्री आहेत.

ते म्हणाले, देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून काश्मिरमध्ये हजाराहून अधिक सैनिक शहीद झाले. पाकिस्तान हा भिकारी झालेला देश आहे. अन्य देशांकडे कटोरा घेऊन फिरत आहे. तो देश भारताशी 24 तासही युद्ध करू शकत नाही. तरीही पाकिस्तानात घुसून मारण्याचे आदेश भारतीय सैन्याला का दिले जात नाहीत? पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे उडवून टाकण्यासाठी भारतीय सैन्याला 24 तासांची सूट देण्याची हिंमतही मोदींमध्ये नाही.

निवडणुकीपूर्वी काहीही घडू शकते. गृहमंत्री, गृहसचिवांचे स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश आले आहेत. देशात काहीही होऊ शकते. हिंदू-मुस्लिम, मराठा- ओबीसी, आदिवासी-धनगर अशा दंगली होणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.
सोमनाथ साळुंखे म्हणाले, भाजपची भाषा संविधान बदलायची नसली तरी कृती मात्र संविधान बदलायची आहे. कंत्राटीकरण, खासगीकरणातून शासकीय नोकर्‍या संपुष्टात आणल्या जात आहेत. देशातील हे सरकार बदलणे काळाची गरज बनली आहे.
दिशा शेख म्हणाल्या, बहुजन समाजाची मत विभागाणी टाळण्याची जबाबदारी केवळ वंचित बहुजन आघाडीचीच नाही. वंचित बहुजन आघाडीला सोबत न घेतल्यास काँग्रेसचेच मोठे नुकसान होईल. त्यांनी कोकणापेक्षा सांगलीत आंब्याचे पीक मोठे असल्याचे सांगत सभेत हशा पिकवला. आंब्याचे सोडा, आम आदमीचा विचार करा, असा सल्लाही शेख यांनी दिला.

इम्तियाज नदाफ म्हणाले, धर्मनिरपेक्ष मतदारांनी एकत्र आले पाहिजे. मुस्लिमांना प्रतिकांमध्ये अडकवण्याचे षड्यंत्र सुरू आहे. त्यापासून त्यांनी सतर्क असले पाहिजे. मुस्लिमांचे खरे नेतृत्व प्रकाश आंबेडकर हेच आहेत. धर्माच्या कसोटीवरही त्यांचे नेतृत्व टिकते.
युवराज जोगी, संतोष सूर्यवंशी, डॉ. क्रांती सावंत, जयसिंग शेंडगे, राजेश जायगव्हाळे, नितीन सोनावणे यांचे भाषण झाले. प्रास्ताविक राजू मुलाणी यांनी केले. महावीर कांबळे, सादिक शेख, प्रा. दादासाहेब ढेरे, इंद्रजित घाटे, इरफान केडीया व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी सत्तेवर आल्यास एक कोटी लोक देश सोडतील

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, 1950 ते 2014 या कालावधीत देशातील 7 हजार 640 नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडून परकीय नागरिकत्व घेतले. हिंदू राष्ट्र करायचे आहे, असे सांगत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या 10 वर्षात 14 लाख हिंदू कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडून परकीय नागरिकत्व स्वीकारले. देश सोडणारी ही सगळी कुटुंबे 50 कोटी किंवा त्याहून जास्त मालमत्ता असणारी आहेत. ईडीची धाड, अटक यातून हे सरकार आपल्या इज्जतीचा फालूदा करेल, या भीतीने त्यांनी देश सोडला आहे. परदेशात गुमनाम आयुष्य जगण्याची अवस्था भाजप सरकारने त्यांच्यावर आणली आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास एक कोटी लोक देश सोडून जातील. ती परिस्थिती येऊ देऊ नका.

मोदींची जगभर छी थू

प्रधानमंत्री मोदी हे आपली प्रतिमा दारू पित नसल्यासारखी करतात. पण त्यांचे मन अल्कोहोलिक आहे, ते लपू शकत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पत्रकार परिषदेचे उदाहरण सांगत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदी यांची पदवी आणि इंग्रजीचे ज्ञान याचा पंचनामा केला. मोदी यांची खर्‍या विद्यापीठाची पदवी नाही. भारताच्या प्रधानमंत्र्यांची जगासमोर छी थू झाली, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

मोदी आणि त्यांचे सांगलीतील गुरू

मोदी आणि त्यांचे सांगलीतील गुरू यांच्यात बरेच साम्य आहे. मोदी पदवीधर असल्याचे सांगतात, तर त्यांचे गुरू एमएसस्सी (सुवर्णपदक) फिजिक्स हे पदव्युत्तर असल्याचे सांगतात. पण हे आपले वर्गमित्र असल्याचे सांगणारा एकही जण अजून पुढे आलेला नाही. ज्या स्टेशनवर चहा विकल्याचे मोदी सांगतात, तेच स्टेशनच त्यावेळी अस्तित्वात नव्हते. मोदींच्या गुरूंनी प्राध्यापकी केल्याचे सांगणारा एकही सहकारी पुढे आलेला नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी केली.

छगन भुजबळ ढोंगी

‘ओबीसींचा नेता’ असल्याचे ढोंग छगन भुजबळ करत आहेत. 1990 मध्ये मंडल शिफारशींच्या अंमलबजावणीवेळी भुजबळ हे मंडल विरोधी भूमिका असणार्‍या कमंडलच्या साथीला होते. त्यावेळी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे ओबीसींच्या बाजूने होते. भुजबळ हे अनेक वर्षे सत्तेत आहेत. पण गेल्या 25 वर्षात ओबीसी आर्थिक विकास महामंडळाने केवळ 38 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले. भुजबळ व वडेट्टीवार हे सत्तेत असताना ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले होते, अशी टीका सोमनाथ साळुंखे यांनी केली. तर ओबीसी-मराठा तेढ निर्माण करण्यासाठी भुजबळांना धनगर समाजाची आठवण झाली आहे, अशी टीका युवराज जोगी यांनी केली.

Back to top button