जयंत पाटील यांच्या दबावामुळे पहिली उचल ३१०० : राजू शेट्टी | पुढारी

जयंत पाटील यांच्या दबावामुळे पहिली उचल ३१०० : राजू शेट्टी

इस्लामपूर; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी आ. जयंत पाटील यांच्या दबावामुळे पहिली उचल जाहीर केली आहे. 3100 रुपयांच्या उचलीने जिल्ह्यातील कारखान्यांना 96 कोटी 46 लाख रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामध्ये राजारामबापू कारखान्याचा 36 कोटी 19 लाख, सोनहिरा कारखान्याचा 24 कोटी 91 लाख रुपयांचा फायदा होणार आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा. राजू शेट्टी यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी दर द्यावा, अन्यथा शुक्रवारी (1 डिसेंबर) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखराळे येथील राजारामबापू कारखान्यावर ऊस काटा बंद आंदोलन करून जिल्ह्यातील ऊस वाहतूक रोखणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष महेश खराडे, पोपट मोरे, भागवत जाधव, संदीप राजोबा, संजय बेले, आप्पासाहेब पाटील, जगन्नाथ भोसले, अ‍ॅड. एस.यू.संदे आदी उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, 38 दिवसांच्या संघर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दराचा प्रश्न मिटला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील , पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा प्रशासन, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी मिळून फॉर्म्युला तयार केला. तो कारखानदारांनी मान्य केला. गतवर्षीच्या उसाला 50 व 100 रुपये व यावर्षीच्या उसाला एफआरपी अधिक 100 रुपये द्यायचे ठरले. त्याप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गेल्यावर्षी तुटलेल्या उसाचे 110 कोटी, यावर्षीच्या तुटणार्‍या उसाला 180 कोटी रूपये जादा मिळणार आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी कोणालाही विश्वासात न घेता 3100 रूपयांची पहिली उचल जाहीर केली.

शेट्टी म्हणाले, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती एकसारखी आहे. सांगली जिल्ह्यातील काही कारखान्यांची रिकवरी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील फॉर्म्युल्याप्रमाणे दर द्यायला काहीच अडचण नाही. मात्र, आ. जयंत पाटील यांच्या दबावाखाली कारखानदारांनी 3100 रुपये दर जाहीर केला आहे. त्यामुळे या हंगामातील गाळपाचा विचार करता राजारामबापू कारखान्याला 36 कोटी 19 लाख, सोनहिरा कारखान्याला 24 कोटी 91 लाख, दत्त इंडिया 4 कोटी 18 लाख, विश्वास कारखाना 5 कोटी 28 लाख, क्रांती कारखाना 18 कोटी 86 लाख, दालमिया 7 कोटी 3 लाख रूपये अशी सुमारे 96 कोटी 46 लाख रूपये इतकी रक्कम कारखानदारांच्या घशात जात आहे. गतवर्षीच्या गाळप झालेल्या उसाला 50 रूपयांप्रमाणे हुतात्मा कारखान्याला 2 कोटी 52 लाख, दत्त इंडिया सांगली 4 कोटी 36 लाख, विश्वास 2 कोटी 84 लाख, उदगिरी 2 कोटी 79 लाख अशी एकूण 12 कोटी 52 लाख रूपये उस उत्पादकांना द्यावे लागतात. इतर कारखाने गतवर्षीच्या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन 50 रूपयांप्रमाणे रक्कम द्यायला तयार आहेत.

काळ्या बाजारात साखर विक्री

राजू शेट्टी म्हणाले, उस आंदोलनावेळी उस वाहतूक वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. मात्र साखरेचे ट्रक अडवून साखर रस्त्यावर फेकली तरीही एकाही कारखानदारांनी गुन्हे दाखल केले नाहीत. कारण, ती साखरेची परस्पर विक्री केले जात असल्याने कोणी तक्रार द्यायला पुढे आले नाहीत. साखर उतारा रिकव्हरी पाडायचा अन् ती साखर काळ्या बाजारात विकायची, असे धंदे कारखानदारांचे सुरू आहेत. साखर उतारा पाडून इथेनॉल मधूनही कारखानदार जादा पैसे मिळवत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस पाठवा….

राजू शेट्टी म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कारखानदारांचा फॉर्म्युला आम्हाला मान्य नाही. सोमवारपासूनच आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत. जादा दर देणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पाठवणार असाल तर ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते ऊस उत्पादकांना सहकार्य करतील.

Back to top button