सांगली : कृष्णाकाठावर हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य

सांगली : कृष्णाकाठावर हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य

Published on

भिलवडी :  कृष्णाकाठावरील गावे हिंस्र प्राण्यांच्या वास्तव्यामुळे भयभीत झाली आहेत. भटकी कुत्री, मगर, तरस, बिबट्या या प्राण्यांमुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. वन विभागाने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमर्‍यांमध्ये मोकाट कुत्र्यांचे कळपच्या कळप दिसून येत आहेत.

भिलवडी, अंकलखोप, ब्रह्मनाळ, चोपडेवाडी, बुरुंगवाडी या भागामध्ये हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याची घटना घडली. बुरुंगवाडी येथे 14 बकरी प्राण्यांनी खाल्ली. ब्रह्मनाळ येथेही अशीच घटना घडली. चोपडेवाडी येथे चार बंदिस्त गोठ्यातील शेळ्या खाल्ल्याची घटना घडली. तेथील शेतकर्‍यांनी हे काम बिबट्याचे असल्याचे सांगितले. त्या परिसरामध्ये बिबट्याचे केस व पायाचे ठसे असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मान्य केले. त्यांनी पंचनामे करून मदत मिळण्यासाठी नागपूर कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवून आर्थिक मदत मिळवून दिली.

गावाच्या नजीक भटकी कुत्री दिसून येत आहेत. ही कुत्री पहाटे व सायंकाळी फिरायला जाणार्‍या नागरिकांवर व मोटारसायकल चालकांवर झेप घेऊन त्यांच्यामागे धावतात. यामुळे नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लगतच्या शहरातून कुत्री पकडून या भागामध्ये सोडली असावीत, असा अंदाज व्यक्त होत आहेत.

या भागात नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मगरी आहेत. मगरीच्या हल्ल्यामध्ये भिलवडीतील रामचंद्र नलावडे तसेच इतरांना प्राण गमवावा लागल्याची घटना घडली आहे. नदीत पोहायला जाणार्‍यांची संख्याही मगरींच्या भीतीने कमी झाली आहे. भिलवडीच्या कुरण भागामध्ये कुमार श्रीपाल चौगुले हे शेतामध्ये बैल जुंपून मशागत करत असताना अज्ञात प्राण्याने त्यांच्या टाचेवर हल्ला केला. त्यांच्या टाचेवर ओरबाडल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार करण्यात आले. हा हल्ला बिबट्याने केल्याची शंका वर्तवली जात आहे.

उसाच्या फडात मिळतो आश्रय

अनेक प्राणी-पक्ष्यांना उसाच्या फडाचा आश्रय म्हणून उपयोग होत आहे. यामुळे तरस, बिबट्या, कोल्हे, रानमांजर, उदमांजर, ससे अशा प्राण्यांना आश्रय मिळतो. सध्या उसाच्या तोडी सुरू असल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री-अपरात्री उसाला पाणी पाजण्यासाठी जावे लागत असल्याने शेतकर्‍यांना सावधगिरी बाळगावी लागते.

वन विभागाकडून जागृती

वन विभागाने जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून भागाची पाहणी केली. घटना घडलेल्या भागातील नागरिकांचे व शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. समूहाने फिरणे, एफएम व स्पीकर लावणे, मोठ्याने बोलणे अशा प्रकारामुळे प्राणी वस्तीपासून लांब जातील, असे उपाय त्यांनी सुचविले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news