जत : विजय ताड खून प्रकरण; सूत्रधार उमेश सावंत यांची माहिती देणारास २५ हजारांचे बक्षीस | पुढारी

जत : विजय ताड खून प्रकरण; सूत्रधार उमेश सावंत यांची माहिती देणारास २५ हजारांचे बक्षीस

जत; पुढारी वृत्तसेवा : जत येथील भाजपचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा भाजपचे माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार आहेत. त्यांची माहिती देणारास २५ हजाराचे रोख बक्षीस देण्याचे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज जाहीर केले. या प्रकरणातील पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चार संशयित आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

जत येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय ताड यांचा दि. १७ मार्च रोजी भर दिवसा गोळ्या झाडून व डोक्यात दगड घालून निर्घूण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अवघ्या तीनच दिवसात चार आरोपींना कर्नाटकातील गोकाक येथून अटक केली होती. अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप उर्फ बबलू चव्हाण, आकाश व्हनखडे , निकेश ऊर्फ दादा मदने, किरण चव्हाण या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर दिनांक ३१ मार्च रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, ताड यांचा खून होऊन पंधरा दिवस उलटले तरी यातील मुख्य सूत्रधार उमेश सावंत हा अद्याप पोलिसांना सापडला नाही. यामुळे ताड कुटुंबियांनी मुख्य सूत्रधारास अटक करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलिसांनी सावंत याची माहिती देणाऱ्यास रोख 25 हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही तपास अधिकारी सतीश शिंदे यांनी सांगितले.

अनेक ठिकाणी छापे

उमेश सावंत यांच्या शोधासाठी पोलिसांनी मुंबई कोकण, विदर्भ, मराठवाडा यासह कर्नाटक सीमावर्ती भागात अनेक ठिकाणी छापे टाकले. परंतु कुठलाही सुगावा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. अखेर पोलिसांना त्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली. जिल्ह्यात बक्षीस जाहीर करून आरोपीची माहिती मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच विजय ताड याचा खून उमेश सावंत यांच्या सांगण्यावरूनच केल्याचे आरोपींनी कबुली दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीं कडील तीन गावठी पिस्टल, दोन वाहने जप्त केले आहेत.

Back to top button