मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कृष्णा कोरडीच | पुढारी

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही कृष्णा कोरडीच

विटा; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांच्या कथित आदेशानंतरही कृष्णेत कोयनेचे पाणी न आल्याने गुरुवारीही नदीपात्र बहुतेक ठिकाणी कोरडेच राहिले. कृष्णा नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यामुळे कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सतत होत होती. जिल्ह्यातील खासदार, आमदार यांचाही पाणी सोडण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. मात्र पाणी सोडले जात नव्हते. याप्रकरणी बुधवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी विट्यात कोयना धरणातून कृष्णा नदीत दरमहा पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे, तसेच तत्काळ गुरुवारपासून हे पाणी नदीपात्रात सोडले जाईल, तसे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे सांगितले होते. तसेच या विषयावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशीही आपले बोलणे झाले आहे, असे म्हटले होते. त्यानंतर कृष्णा नदीकाठच्या लोकांनी गुरुवारी कोयनेच्या पाण्याची वाट पाहिली. परंतु कृष्णा आजही कोरडीच राहिली आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांच्या विरोधामुळेच कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत नाही. तसेच ज्या जिल्ह्यातून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येतात, त्या सातारा जिल्ह्यात धरण आहे, म्हणून आमदार बाबर यांनी जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे न करता थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांचे संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना तसे लेखी अथवा तोंडी आदेश गेले आहेत अथवा नाही, याबाबत लोकांतून साशंकता व्यक्त केली जात आहे.

एखाद्दुसरा दिवस पुढे-मागे होऊ शकतो

याबाबत आमदार अनिल बाबर यांना विचारले असता, मुख्यमंत्री आज दिवसभर राजस्थानच्या प्रचार दौर्‍यात आहेत. रात्री त्यांच्याशी बोलणे होईल, पाणी सोडायला एखाद्दुसरा दिवस मागे-पुढे होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Back to top button