

सांगली; पुढारी वृत्तसेवा : चार महिन्यांची हजेरी लावून मानधन देण्यासाठी 8 हजारांची लाच स्वीकारताना महापालिकेच्या प्रभारी मुकादमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. किशोर जगन्नाथ जबडे (वय 48, रा. सुभाषनगर, मिरज) असे त्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे महापालिकेकडे मानधनावर कामगार आहेत. त्यांची गेल्या चार महिन्यापांसून हजेरी लावून ते मानधन द्यायचे होते. यासाठी प्रभाग क्रमांक 20 चा प्रभारी मुकादम जबडे याने प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये असे चार महिन्यांच्या 12 हजार रुपयांची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदार यांनी 'लाचलुचपत'कडे तक्रार केली होती. जबडे याने तक्रारदारांकडे 12 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 8 हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार मिरज शहर पोलिस ठाण्याजवळ सापळा रचण्यात आला होता. जबडे हा तक्रारदार यांच्याकडून 8 हजारांची लाच घेताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 'लाचलुचपत'चे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील, निरीक्षक विनायक भिलारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.