ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळवणारच : जरांगे-पाटील | पुढारी

ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळवणारच : जरांगे-पाटील

सांगली, पुढारी वृत्तसेवा : गेल्या 70 वर्षांपासून मराठा समाजाला चारही बाजूने वेढा पडला आहे. त्यातून सुटका करण्यासाठी समाज एकवटला आहे. त्यामुळे आता राज्यातील मराठा समाज ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळविणारच, असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी येथे झालेल्या जाहीर सभेत दिला. ओबीसीतून सरकसट आरक्षण द्यावे लागेल; अन्यथा आता सरकारला सुट्टी नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

येथील तरुण भारत स्टेडियमवर भर उन्हात त्यांची सभा झाली. सभेला मोठी गर्दी झाली होती. यावेळी जरांगे यांनी सरकार व नेते यांच्यावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, गेल्या 70 वर्षांपासून समाजाला आरक्षण नाकारण्यात आले. विविध आयोग नेमले, त्यांनीही पुरावा नाही म्हणून आरक्षण नाकारले. आता मराठा समाज एकवटल्यानंतर लाखाने पुरावे पुढे येत आहेत. सत्तर वर्षांपूर्वी आरक्षण

मिळाले असते तर समाज प्रगत झाला असता. आता आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात आहे. आता विजयाचा दिवस जवळ आहे. त्याला गालबोट लागू नये, याची काळजी घ्या. मराठा एकत्र येत असल्याने काही कळप तयार होत आहेत. शांततेत आंदोलन करा. जातीला वेढा पडू देऊ नका. आपल्या मुला-बाळांसाठी आरक्षण आवश्यक आहे. ते मिळाल्याशिवाय समाज गप्प बसणार नाही. त्याची दखल घेऊन सरकारने आरक्षण द्यावे.

सांगलीत आल्यानंतर जरांगे-पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले. समाजबांधवांनी पुष्पवृष्टी करीत जरांगे यांना व्यासपीठावर आणले. यावेळी जरांगे-पाटील यांचा जिल्ह्यात बेमुदत उपोषण करणार्‍या बांधवांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये विनायक कदम (कसबे डिग्रज, ता. मिरज), श्रीकांत पवार व सूरज पाटील (कुची, ता. कवठेमहांकाळ), बाळासाहेब पाटील (इरळी, ता. कवठेमहांकाळ), प्रकाश वाळेकर (बेडग, ता. मिरज), अजित जगताप (सांगली-कुपवाड), सातवीत शिकणारी मुलगी आर्या अमोल चव्हाण ( सांगली) उपस्थित होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मालन मोहिते उपस्थित होत्या. त्याशिवाय लहान मुले, महिला यांच्यासह समाजबांधवांची मोठी गर्दी झाली होती. राणी यादव यांनी सूत्रसंचालन केले.

नेत्यांना आपणच मोठे करून चूक केली

जरांगे-पाटील म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांना आपणच मोठे केले आहे. त्यांचे बंगले झाले, गाड्या आल्या. त्यांची मुले परदेशात शिकून आल्यानंतर आपणच त्यांना भैया म्हणून त्यांच्या मागे लागतो. ही आपण मोठी चूक केली. ते आरक्षणासाठी आपल्या मदतीला येणार नाहीत. मराठा आरक्षणाचा लढा आपणालाच लढावा लागेल.

* जेसीबीतून फुलांची उधळण करीत जरांगे-पाटील यांचे स्वागत
* 25 डिसेंबर रोजी बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविणार
* स्टेजवर फक्त जरांगे-पाटलांची उपस्थिती
* संयोजकांकडून चहा, पाण्याची व्यवस्था
* भगवे झेंडे, टोप्या, घोषणांनी उत्साह
* सर्वच पक्षांचे नेते स्टेजपासून दूर
* एक मराठा लाख मराठा, जय भवानी जयशिवाजी, आरक्षण आमच्या हक्काचे… या घोषणांनी मैदान दुमदुमले
* सभेला पोलिसांचा मोठा बंंदोबस्त

Back to top button