World COPD Day : धूर, धुळीचा फुफ्फुसावर जीवघेणा परिणाम

World COPD Day : धूर, धुळीचा फुफ्फुसावर जीवघेणा परिणाम
Published on
Updated on

सांगली :  ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग्ज डिसीजेस या जागतिक संस्थेच्यावतीने 2002 पासून नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार म्हणजे यावर्षी '15 नोव्हेंबर 2023' हा दिवस जागतिक सीओपीडी दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. धूर आणि धुळीचा फुफ्फुसावर जीवघेणा परिणाम होत असताना आणि जगभरातील एकूण मृत्यूच्या आकडेवारीत सीओपीडीचा तिसरा क्रमांक लागत असताना याबाबत जागरूकता होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सीओपीडी म्हणजे काय?

सीओपीडी म्हणजे दीर्घ कालावधीसाठी श्वसनास अडथळा आणणारा फुप्फुसांचा चिवट विकार. कोणत्याही प्रकारचा धूर आणि धुळीमुळे फुप्फुसातील सूक्ष्म श्वासवाहिन्या आणि वायुकोश यांच्या आकुंचन-प्रसरणावर परिणाम होतो. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. फुफ्फुसात हवा अडकून राहते. या स्थितीला सीओपीडी म्हणतात. धूम्रपान करणार्‍या व्यक्तींनाच नाही, तर आजुबाजूला धूम्रपान करणार्‍या व्यक्तींमुळे इतरांनाही सीओपीडीचा धोका संभवतो. काही वेळा हा विकार आनुवंशिक असतो.

धोका कुणाला?

प्रदूषित वातावरणात दीर्घकाळ राहणार्‍यांना, वर्दळीच्या रस्त्यावर, चौकात ज्यांची घरे, व्यवसाय, कार्यालये किंवा दुकाने असलेल्यांना, धुराशी – धुळीशी संपर्क येणार्‍यांना.

लक्षणे

सुरुवातीच्या टप्प्यात थोडासा दम लागणे किंवा व्यायामानंतर दम लागणे, नंतरच्या टप्प्यात छातीतून घरघर आवाज येणे, श्वास घ्यायला कठीण होणे, थुंकीचा घट्टपणा किंवा थुंकीचे प्रमाण वाढणे, थुंकीतून रक्त पडणे, वारंवार सर्दी, फ्ल्यूसारखी लक्षणे दिसणे, श्वसनमार्गात जंतुसंसर्ग किंवा न्यूमोनिया होणे, अशक्तपणा येणे. याकडे दुर्लक्ष केले, तर फुफ्फुसांची हानी होत जाते आणि नंतर नंतर लक्षणे अधिक तीव्र होत जातात.

चाचण्या

सीओपीडीचे निदान पल्मोनरी फंक्शन टेस्ट (स्पायरोमेट्री) या चाचणीद्वारे केले जाते. काही चाचण्या व्यक्ती – व्यक्तीनुसार ठरवल्या जातात. सीओपीडीसाठी श्वासावाटे घ्यावयाची औषधे अत्यंत परिणामकारक ठरतात. उपचाराने मात करणे अशक्य झाल्यास शेवटी शस्त्रक्रिया करावी लागते.

प्राणवायू आपल्या पेशीपर्यंत नीटपणे पोहोचवायचा असेल, तर आपली फुफ्फुसे निरोगी असणे महत्त्वाचे. नियमित औषधोपचार, सकस आहार, श्वसनाचा व्यायाम, तणावरहित जीवनशैली याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांचा विनाविलंब सल्ला, त्यांनी दिलेली औषधे नियमितपणे आणि वेळेवर घेतल्यास सीओपीडीमुळे होणारा त्रास आटोक्यात राहू शकतो.
– डॉ. अनिल मडके,
छातीरोग विशेषतज्ज्ञ

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news