सांगली : ‘स्वाभिमानी’ आक्रमक; ऊस दर आंदोलन पेटण्याची चिन्हे | पुढारी

सांगली : ‘स्वाभिमानी’ आक्रमक; ऊस दर आंदोलन पेटण्याची चिन्हे

सांगली; पुढारी वृत्तसेवा : उसाची पहिली उचल 3 हजार 500 रुपये जाहीर करा. गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता द्या, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. अनेक भागात ऊस वाहतूक करणारी वाहने अडविण्यात येत आहेत. कारखान्याच्या कार्यालयास टाळे ठोकले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वादावादी होत आहे. कारखानदारांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर येत्या काही दिवसांत आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

अनेक गावात ऊसतोडी बंद पाडल्या आहेत. पलूस, वाळवा, शिराळा यासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वाहतूक करणार्‍या वाहनांची हवा सोडण्यात येत आहे. संघटनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. कोठे तोडी सुरू आहेत का? याची पाहणी करीत आहेत.
सांगलीत शिवशंभू चौकात दत्त इंडियाची वाहतूक करणार्‍या वाहनांच्या टायरी फोडल्या. तसेच कर्नाळ रोडवर रजपूत मंगल कार्यालयासमोर दत्त इंडियाची वाहतूक करणारी सुमारे 15 ते 20 वाहने अडविण्यात आली.

शेतकर्‍यांचे ‘दिवाळ’ काढून कारखानदार दिवाळी साजरी करीत आहेत. मात्र ऊस उत्पादकांना हक्काचे पैसे मिळेपर्यंत गप्प बसणार नाही. ‘स्वाभिमानी’च्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे जिल्ह्यात ऊस वाहतूक करणारे एकही वाहन फि रू देणार नाही. पुढील दिवसांत आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहे.
– महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी

स्वाभिमानीच्या मागणीकडे कारखानदारांनी गांर्भीयाने लक्ष द्यावे. शेतकर्‍यांनी ऊस तोडी सुरू करू नये. कारखानदारांनी जबरदस्ती करू नये. जबरदस्ती करताना कोणती दुर्घटना घडल्यास कारखानदार जबाबदार असतील. पुन्हा वसगडे प्रकरण होऊ द्यायचे नसेल तर हा प्रश्न निकालात काढा.
– संदीप राजोबा, कार्याध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी

Back to top button