सांगली : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ सजली | पुढारी

सांगली : दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठ सजली

सांगली; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी पावसाने दाणादाण उडविल्यानंतर सावरलेल्या सांगलीकरांनी आता दिवाळीची खरेदी जोमाने सुरू केली आहे. सांगली शहरातील सार्‍या बाजारपेठांमध्ये दिवस-रात्र गर्दी उसळली आहेच; पण उपनगरांमधूनही किराणा आणि कापड दुकानांसोबत लहान लहान स्टॉल्सवर खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

दिवाळी अगदी अंगणात आली आहे. यंदा किराणा मालाचे दर स्थिर असल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे. घराघरांत दिवाळीचा फराळ तयार करण्याची घाई सुरू आहे. तयार फराळ खरेदी करण्याकडेही कल आहे. नोकरदार महिला, छोटे कुटुंब असलेले लोक घरी फराळ तयार करण्यापेक्षा तो तयारच खरेदी करतात. त्यामुळे दिवाळीच्या फराळाची उलाढालही कोटीच्या घरात आहे. चौका-चौकात तर फराळाचे स्टॉल्स लागले आहेतच, शिवाय बेकरी, हॉटेल्स, मोठे बझार, मॉल्समधूनही तयार फराळ मिळत आहे. कापड पेठेतही कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी होते आहे. नवीन कपड्यांवर मोठी सवलत देण्याचा सपाटा दुकानदारांनी लावला असल्याने खरेदीही जोरात होत असल्याचे चित्र आहे.

कपड्यांसोबत आकाशकंदील, विद्युत रोषणाईचे साहित्य, फुलांच्या माळा, रांगोळी, पणत्या यांचीही खरेदी होत आहे. चौका-चौकात याचे स्टॉल्स उभे आहेत. दत्त-मारुती रस्त्यावर भरणारा पारंपरिक बाजार हटविल्याने स्थानिक व्यापारावर परिणाम झाला आहे. आकाशकंदील, सजावटीसाठी लागणार्‍या साहित्यामध्ये चायना मेड उत्पादनांची मागणी घटली आहे.

वाहतुकीची कोंडी

सांगलीत सराफ पेठ, गणपती पेठ, कापड पेठ, मार्केट यार्ड, हरभट रोड, सांगली मुख्य बसस्थानक परिसरात दिवाळीच्या खरेदीनिमित्त सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गर्दी होत आहे. परिणामी, शहरातील वाहतूक व्यवस्था गर्दीने पार कोलमडून गेली आहे. या गर्दीला शिस्त लावण्याची गरज आहे. दुसर्‍या बाजूला या गर्दीचा प्रचंड मनस्ताप बायपास मार्गे जाणार्‍या गर्दीलाही होतो आहे. रेल्वे गेटवर तुफान गर्दी तुंबून राहत आहे.

Back to top button