सांगली : भाजप पोहोचला गावात, काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत

सांगली : भाजप पोहोचला गावात, काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतेत
Published on
Updated on

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमाने भाजप आता गावात पोहोचल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. सांगली जिल्हा हा तसा काँग्रेस-राष्ट्रवादीचा, मात्र या निकालाने त्यांना भाजपने आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. अन्यथा याचा हिशेब आगामी लोकसभा निवडणुकीत द्यावा लागणार आहे.

ग्रामपंचायतीची निवडणूक ही तशी पक्षनिहाय असते. कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक होत नाही. त्याचबरोबर गावातील गटा-तटावरून ही निवडणूक होत असते. अनेकदा एकाच पक्षातील दोन गटामध्येच ही निवडणूक होत असते. यामुळे यातून पक्षीय निकाल काढता येत नाहीत. तरीही गावातील या निवडणुकीवरून आगामी निवडणुकीतील मतदारांचा कौल दिसून येतो. पक्षाचे नेते यामध्ये उतरले नसले तरी, मतदारसंघावर आपली पकड ठेवण्यासाठी आजी-माजी आमदारांनी जोर लावला होता.

जिल्ह्यात 83 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपने 33, शिवसेना शिंदे गटाने 3, काँग्रेस, राष्ट्रवादीने (शरद पवार गट) 28, स्थानिक आघाडीने 18 व मनसेने एका ग्रामपंचायतीवर विजय मिळवला. केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा भाजप आघाडीला या निवडणुकीत फायदा झाला. भाजपचे पालकमंत्री असल्यामुळेही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळण्यास मदत झाली. काँग्रेस-राष्ट्रवादीत असलेल्या मतभेदाचाही या निवडणुकीत त्यांना फटका बसला. याचा फायदा भाजपला होऊन हा पक्ष आता गावा-गावात पोहोचला. शिवसेना ठाकरे गटाला या निवडणुकीत अपयश आले. पदाधिकारी गावपातळीपर्यंत पोहोचण्यात कमी पडले आहेत.

पलूृस, कडेगाव मतदारसंघाचा विचार करता, कुंडल ग्रामपंचायत व विठ्ठलवाडी आणि आमणापूरमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला धक्का बसला. कुंडल ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता काबीज केली आहे, तर आमणापूर, राडेवाडी, विठ्ठलवाडी येथे राष्ट्रवादी व भाजपने मारलेल्या मुसंडीने काँग्रेसवर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली.
कडेगाव तालुक्यात तीनपैकी 2 ठिकाणी काँग्रेस व एक ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेली आहे. जत तालुक्यातील पाचही ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकवून काँग्रेसला धोबीपछाड केले. तासगावमध्ये दोन ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर झाल्याने याचा राष्ट्रवादीला धक्का बसला. चिखलगोठणमध्ये सरपंच पदासह भाजपची सत्ता आली. कवठेमहांकाळमध्येही राष्ट्रवादीकडे सात व घोरपडे गटाकडे सात ग्रामपंचायती आल्या आहेत. आटपाडीमध्येही नवीन राजकीय समीकरणे उदयास आली आहेत. याठिकाणच्या 17 ग्रामपंचायतींमधील आठ ग्रामपांयतींवर भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या मदतीने सत्ता आणली आहे.

सांगली मतदारसंघामध्ये चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये एक भाजप, एक काँग्रेस, तर दोन ठिकाणी स्थानिक आघाडीने सत्ता मिळवली. मिरज मतदार संघातील एका ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक आघाडी सत्तेवर आली. शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. या मतदारसंघात 11 ठिकाणी राष्ट्रवादीने, तर भाजपाने 7 ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली. मनसेने एका ठिकाणी सत्ता मिळवली.

बिनविरोध 25 ग्रामपंचायती कोणाच्या ?

यापूर्वी जिल्ह्यातील पूर्ण अकरा आणि पोटनिवडणूक असलेल्या चौदा अशा 25 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या ग्रामपंचायती कोणत्या पक्षाच्या, हे स्पष्ट झालेले नाही. यातील अनेक ग्रामपंचायतीवर काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप या तीनही पक्षाने दावा केला आहे. सध्या तरी नेता ज्या पक्षाचा, त्याची ग्रामपंचायत असे समजले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news