सांगली: १० नोव्हेंबरपासून टेंभूचे आवर्तन सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन | पुढारी

सांगली: १० नोव्हेंबरपासून टेंभूचे आवर्तन सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यातील कालवा समितीचीच्या बैठकीत १ नोव्हेंबर २०२३ पासून ताकारी व म्हैशाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याचे व टेंभू योजनेचे आवर्तन १५ डिसेंबर २०२३ पासून सुरू करण्याचे ठरले आहे. कडेगाव तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका जाहीर झाला आहे . येथे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे टेंभूचे आवर्तन ताकारी, म्हैशाळ प्रमाणेच १० नोव्हेंबरपासून सुरू करावे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू, असा इशारा कडेगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार अजित शेलार यांना देण्यात आले आहे.

कडेगाव तालुका हा महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्य झालेला तालुका आहे. जमिनीतील पाण्याची पातळी ही अतिशय खालावली आहे, विहिरी कोरड्या पडत आहेत. शासनाने राज्यातील जाहीर केलेला दुष्काळी तालुक्याच्या यादीत कडेगाव तालुक्याचा समावेश आहे. १५ डिसेंबर २०२३ ला आवर्तन चालू केल्यास या तालुक्यातील जनतेचे व जनावरांचे पाण्याभवी हाल होणार आहेत. सर्व पिके वाळून जातील. ताकारी आणि म्हैशाल योजनेचे आवर्तन १ नोव्हेंबरपासून मग टेंभूचेच १० डिसेंबरपासून का सुरू होणार. हा निर्णय कडेगाव तालुक्यातील टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यावर हा अन्याय आहे.

तेव्हा या सर्व गोष्टींचा विचार करून १० नोव्हेंबर २०२३ पासून टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करावे. शासनाने जर आवर्तन सुरू केले नाही, तर कडेगाव तालुक्यातील सर्व शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील व याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची राहील.

यावेळी सुरेश थोरात, डी. एस. देशमुख, विजय शिंदे, मनोजकुमार मिसाळ, सागर सकटे, रघुनाथ गायकवाड, शशिकांत रासकर, सिद्दिक पठाण, मोहन माळी, प्रदीप देसाई, वैभव देसाई, अशोक शेटे, फिरोज शेख, संजय तडसरे, दादासो माळी, प्रवीण करडे, दत्तात्रय भोसले, अशोक धर्मे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button