सांगली : कुपवाड, मिरजेतील 1200 उद्योगांचा पाणीपुरवठा बंद | पुढारी

सांगली : कुपवाड, मिरजेतील 1200 उद्योगांचा पाणीपुरवठा बंद

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : सांगलीतील कृष्णा नदीपात्रातील पाणीपातळी कमी झाल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कुपवाड व मिरज या दोन्ही औद्योगिक वसाहतीमधील अंदाजे 1200 उद्योगांना होणारा पाणीपुरवठा बुधवारी (दि. 1 ) रात्री अकरा वाजलेपासून बंद झाल्याने उद्योगांच्या चाकांना ब्रेक लागला आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने कोट्यवधी रुपयांच्या उत्पादनात घट झाली आहे. दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा बंद झाल्याने उद्योजकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचबरोबर घरगुती ग्राहकांचाही पाणीपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कुपवाड व मिरज या दोन्ही औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सांगलीतील कृष्णा नदीतील महामंडळाच्या अशुध्द पाणीपुरवठा केंद्रातून औद्योगिक क्षेत्राचा तसेच घरगुती ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. त्यामुळे कुपवाड, मिरज या दोन्ही एमआयडीसीतील 1200 च्या आसपास उद्योगांचा तसेच 90 घरगुती ग्राहकांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाणीपुरवठा खंडित झाल्याने औद्योगिक वसाहतीमधील सर्वच उद्योगांच्या चाकांना ब्रेक लागला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणीपुरवठा खंडित झाल्याने औद्योगिक उत्पादनात घट झाली आहे. उद्योग बंद झाल्याने उद्योजकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

जानेवारी 2023 पासून आजअखेर अनेकदा औद्योगिक क्षेत्राचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. जागतिक मंदी, महापूर, कोरोना महामारीच्यावेळी अनेक दिवस सर्वच उद्योग बंद पडले होते. या संकटात उद्योजक कर्जबाजारी झाले होते. आर्थिक नुकसान सोसूनही उद्योजकांनी उद्योग टिकवून ठेवले आहेत. शेजारील राज्यापेक्षा महाराष्ट्रात विजेचे दर भरमसाट वाढलेले आहेत. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी उद्योजकांना वीज दरवाढीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक समस्यांना उद्योजकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच उद्योगांचा पाणीपुरवठा खंडित झाल्याने उद्योजक हतबल झाले आहेत.

कुपवाड, मिरज औद्योगिक क्षेत्राला नियमित पाणी द्या

पाणीपुरवठा करण्यासाठी सांगलीतील कृष्णा नदीपात्रात कोयना धरणातून पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना विनंती केलेली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाटबंधारे खात्याच्या संपर्कात राहून औद्योगिक क्षेत्राला होणार्‍या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची दक्षता घेत आहे. तरी सर्व उद्योजकांनी व घरगुती पाणी ग्राहकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहनही एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी केले आहे.

Back to top button