दारूसाठी पैसे न दिल्याने मांगलेतील वृद्धाचा खून | पुढारी

दारूसाठी पैसे न दिल्याने मांगलेतील वृद्धाचा खून

मांगले, पुढारी वृत्तसेवा : दारूसाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून मांगले (ता. शिराळा ) येथील धनटेक वसाहतीमधील रामचंद्र कोंडीबा सुतार (वय 60) या वृद्धाचा संदीप शामराव सुतार (वय 35) याने खून केल्याची कबुली शिराळा पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत रामचंद्र सुतार याचा संशयित संदीप सुतार हा मेव्हुणीचा मुलगा आहे. तो रामचंद्र सुतार यांच्याकडे पाहुणा म्हणून आला होता. गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दोघेही मद्य प्राशन करून होते. संशयित संदीप हा रामचंद्र सुतार यांच्याकडे दारूसाठी पैसे मागत होता. पण त्यांनी नकार दिल्यावर संदीप सुतार याने वृध्द रामचंद्र सुतार यांच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये रामचंद्र यांचा जागीच मृत्यू झाला. कामावरून पत्नी आल्यावर पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

त्यांनी आरडा-ओरडा केल्यावर आजुबाजूचे लोक जमा झाले होते. तोपर्यंत संशयित संदीप हा घरामध्ये कडी लावून झोपला होता. दरम्यान, शिराळा पोलिस घटनास्थळी आले. घटनास्थळाचा पंचनामा केला आणि संशयित संदीप सुतार याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. मृत रामचंद्र सुतार यांची पत्नी इंदुताई यांनी शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, रामचंद्र यांचा मृतदेह रात्री उशिरा उत्तरीय तपासणीसाठी शिराळा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, रात्री उशिरा इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी मंगेश चव्हाण, शिराळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी घटनास्थळाला भेट दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक जयसिंग पाटील, हवालदार काशिलिंग गावडे अधिक तपास करीत आहेत.

Back to top button