सांगली : जतमध्ये डेंग्यूने शाळकरी मुलीचा घेतला बळी
जत; पुढारी वृत्तसेवा : जत शहरात डेंग्यू तापाचे रुग्ण वाढले असून जत येथील वाचनालय चौकातील डेंग्यूचा पहिला बळी एक शाळकरी मुलगी ठरली आहे. श्रध्दा राहुल जाधव (वय 12) असे डेंग्यूची बळी गेलेल्या मुलीचे नाव आहे. सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान ती मृत झाली आहे.
श्रद्धा ऊर्फ पियू जाधव ही जत येथील जत हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत होती. गेला आठवडाभर ती तापाने आजारी होती. जत येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी सांगलीस नेण्याचे सांगितले. शरीरातील पेशी कमी झाल्याने तीन दिवस सांगलीत खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचे बुधवारी सकाळी निधन झाले.