तासगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राज्यभर आंदोलनाची ठिणगी पेटलेली आहे. गावा-गावामध्ये नेत्यांना बंदी घालण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या आवाहनास प्रतिसाद देत तासगाव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमन पाटील यांनी आपले सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपण विधानसभेत आग्रही भूमिका मांडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सकल मराठा समाजाच्या शनिवारी तासगाव तालुक्यात बैठका झाल्या. जोपर्यंत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. तासगाव येथेही उपोषण सुरू केले आहे. चिंचणीचे अक्षय पाटील, तासगावचे विशाल शिंदे व शरद शेळके हे उपोषणास बसत आहेत.
बैठकांमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येत आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आवाहनास प्रतिसाद देत आ. सुमन पाटील यांनी आपले सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपण विधानसभेत बाजू मांडू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.