Sangli News: पाणी दुष्काळ प्रश्नावरून सांगलीत आंदोलनाचा भडका | पुढारी

Sangli News: पाणी दुष्काळ प्रश्नावरून सांगलीत आंदोलनाचा भडका

सांगली; पुढारी वृत्तसेवा: गेल्या काही दिवसापासून कृष्णा नदीचे पात्र जिल्ह्यात कोरडे पडल्याने पिण्याच्या व सिंचनाचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागणी होऊनही वाहिनीतून पाणी सोडले जात नाही. त्यामुळे आज (दि.२७) राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी आमदार, इरिगेशन फेडरेशन यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडत आंदोलन करण्यात आले. त्याशिवाय जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तर काँग्रेसतर्फे नदीत तात्काळ पाणी सोडावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यामध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला असल्याने धरणातील उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करीत पिण्यासाठी तसेच सिंचनासाठी प्राधान्य देणे आवश्यक आहे. वीजनिर्मिती करीता वेगवेगळे पर्याय उपलब्ध असल्याने वीजनिर्मिती करीता लागणाऱ्या पाण्यामध्ये आवश्यक ती कपात करावी. सिंचन व पिण्यासाठी पाणी व्यवस्थित उपलब्ध झाल्यास अन्नधान्य उत्पादन व्यवस्थित होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील.

शासनस्तरावर पाऊस व हवामानाचा अंदाज घेवून अगोदरच उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. याबाबत जलसंपदा विभागाकडे शेतकऱ्यांनी व विविध शेतीपुरक संस्थांनी अनेकवेळा मागणी करुन देखील कोयना धरणातून पाणी सोडले गेले नाही. यामुळे मागील दहा दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी पूर्णतः खालावली असून जागोजागी नदी पात्र कोरडे पडले आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भावल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. या संपूर्ण बाबींमध्ये योग्य नियोजनाचा आभाव दिसून येतो. तरी आम्ही या निवेदनाद्वारे आपणांस विनंती करतो की, त्वरीत कोयना धरणातून पाणी सोडण्यात यावे.

आंदोलनामध्ये आमदार मानसिंगभाऊ नाईक, आमदार अरूण लाड, आमदार सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, बाळासाहेब होनमोरे, देवराज पाटील, दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button