सांगली: हिंगणगादे गावात राजकीय नेत्यांना बंदी | पुढारी

सांगली: हिंगणगादे गावात राजकीय नेत्यांना बंदी

विटा : पुढारी वृत्तसेवा : हिंगणगादे (ता.खानापूर) येथील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि विविध संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत खासदार, आमदार, नगरसेवक, पंचायत समितीचे सभापती यांच्यासह सर्व राजकीय पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना गावबंदी करणारे हिंगणगादे गाव सांगली जिल्ह्यात पहिले ठरले आहे. आज दुपारी झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर हिंगणगादे येथील सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व नेते आणि सर्वच राजकीय पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शिवाय गावाच्या मुख्य रस्त्यावर “एकच मिशन मराठा आरक्षण”, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी असेल. जो कोणी येईल, त्याचा मराठा आरक्षणाला विरोध आहे असे समजून त्याच्यावर राजकीय बहिष्कार घालण्यात येईल, असे ठळक अक्षरात फलक लावलेले आहेत.

यावेळी शंकर नाना मोहिते, सरपंच अजितकुमार मोहिते, विकास सोसायटीचे अध्यक्ष जालिंदर मोहिते, परशुराम साळुंखे, विष्णू यादव, महादेव कदम, निलेश निकम, काकासो मोहिते, राहुल सूर्यवंशी, रमेश मोहिते, रमेश सूर्यवंशी यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button