सांगली : १०० गुंडांची झाडाझडती! | पुढारी

सांगली : १०० गुंडांची झाडाझडती!

सांगली; पुढारी वृत्तसेवा : खून, खुनाचा प्रयत्न यासह गंभीर गुन्ह्यातील शंभर गुंडांना गुरुवारी एकाचवेळी ताब्यात घेऊन त्यांची चांगलीच झाडाझडती घेण्यात आली. पोलिस मुख्यालयात गुन्हेगारांचा आदान-प्रदान कार्यक्रम पार पडला. यावेळी या गुंडांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. सध्या ते काय करतात, याची सर्व कुंडलीच लिहून घेतली.

जिल्ह्यात 25 पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली. यामध्ये विशेषत: खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी असे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली होती. गेल्या दहा वर्षांपासून गुन्हेगारीत सक्रिय असलेले गुंड सध्या काय करतार्त, त्यांच्या उत्पन्नाचे साधन काय, ते सध्या कुठे राहतात, दिवसभर कुठे असतात, याची सर्व माहिती घेण्यात आली.

पोलिस मुख्यालयात गुन्हेगारांचा आदान-प्रदान हा कार्यक्रम झाला. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे, विश्रामबागचे संजय मोरे, सांगली ग्रामीणचे शिवाजी गायकवाड, संजयनगरचे सूरज बिजली यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांतील गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखेचे पथक उपस्थित होते. रेकॉर्डवरील शंभर गुंडांना नोटिसा देऊन बोलाविण्यात आले होते. उपअधीक्षक जाधव यांनी प्रत्येक गुंडाशी संवाद साधून, तो सध्या काय करतो, याची माहिती घेतली.

मित्रांची नावे, मोबाईल क्रमांक घेतले

आदान-प्रदान कार्यक्रमास आलेल्या सर्व गुंडांचे मोबाईल क्रमांक घेण्यात आले आहेत. तसेच त्यांचे मित्र कोण? ते कुठे राहतात? ते काय काम करतात? त्यांची नावे, पत्ते व मोबाईल क्रमांकही घेतले.

Back to top button