मिरज : 35 डीजे मालक, मंडळांच्या अध्यक्षांना पोलिसांचा झटका | पुढारी

मिरज : 35 डीजे मालक, मंडळांच्या अध्यक्षांना पोलिसांचा झटका

मिरज, पुढारी वृत्तसेवा : यंदाच्या गणेशोत्सव मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट करणार्‍या 35 डॉल्बी मालक आणि गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांना कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची लवकरच पोलिस उपअधीक्षक यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीला परवानगी देण्यात आली होती. परंतु आवाजाची मर्यादा घालून देण्यात आली होती. आवाज मर्यादेचे उल्लंघन करू नये यासाठी पोलिसांनी वेळोवेळी आवाहन देखील केले होते. परंतु जिल्ह्यात सर्वत्र डॉल्बीचा दणदणाट झाला होता. जिल्ह्यात डॉल्बीसमोर नाचताना तिघांचा मृत्यू देखील झाला होता. परंतु त्या तिघांचा मृत्यू आकस्मिक अशे नोंद केली होती.

मिरजेतील अनंतचतुर्दशीच्या मिरवणुकीत मंडळांमध्ये नेहमीच चढाओढ पाहावयास मिळते. यावर्षी देखील सर्वच मंडळांकडून डॉल्बीचा दणदणाट केला होता. यावेळी नियुक्तपथकाकडून 35 मंडळांनी आवाज मर्यादेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. 90 ते 111 डेसीबलपर्यंत आवाजाची त्यावेळी ध्वनिक्षेपक यंत्रावर नोंद करण्यात आली होती. त्यानुसार आता 35 मंडळांच्या अध्यक्षांसह डॉल्बी मालकांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. लवकरच त्यांची सुनावणी घेऊन त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे यांनी सांगितले.

Back to top button