सांगली, पुढारी वृत्तसेवा : आंध्र प्रदेश राज्यातील टनकू (जि. पश्चिम गोदावरी) येथील गलई व्यावसायिक नामदेव गुरुनाथ देवकर यांच्या घरात सशस्त्र दरोडा टाकलेल्या घटनेचा सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी छडा लावला. या गुन्ह्यातील तिघांना बुधगाव (ता. मिरज) येथे अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दरोड्यात लुटलेले तीन किलो एक तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
अटक केलेल्यांमध्ये सूरज बळवंत कुंभार (वय 33, कुर्ली, ता. खानापूर), कैलास लालासाहेब शेळके (30, बामणी, ता. खानापूर) व सादिक ताजुद्दीन शेख (35, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांचा समावेश आहे. देवकर यांचा गलई व सोने तारण व्यवसाय आहे. सूरज कुंभार हा गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या दुकानात कामाला होता. दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी देवकर व त्यांच्या पत्नी घरी होत्या. त्यावेळी कुंभार याने साथीदारांच्या मदतीने देवकर यांच्या घरात प्रवेश केला.
देवकर पती-पत्नीचे हात-पाय बांधून व तोंडाला चिकटपट्टी बांधली. घरातील तिजोरीतील सोन्याचे दागिने, बिस्कीट व एक लाखाची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी पश्चिम गोदावरी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल होता. संशयितांची नावे निष्पन्न करण्यात आंध्र प्रदेश पोलिसांना यश आले होते. त्यांच्या शोधासाठी तेथील पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले होते.
पथकाने जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांची भेट घेतली. डॉ. तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांना पथकाला सहकार्य करण्याचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व आंध्र प्रदेश पोलिस संयुक्तपणे संशयितांचा शोध घेत होते. त्यावेळी तिघेही बुधगाव येथील राजाधीराज ढाब्यासमोर उभे असल्याची माहिती मिळाली.
पथकाने तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एक बॅग सापडली. त्याची झडती घेण्यात आली. त्यामध्ये तीन किलो दहा ग्रॅम सोन्याचे दागिने, दोन हजाराची रोकड व एक मोबाईल असा एकूण एक कोटी 78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांचा ताबा आंध्र प्रदेश पोलिसांकडे देण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, उपनिरीक्षक कुमार पाटील, हवालदार अमोल लोहार, संदीप गुरव, बिरोबा नरळे, सागर लवटे, अमर नरळे यांच्यासह आंध्र प्रदेश राज्यातील पोलिसांनी ही कारवाई केली.