कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : तारांद्वारे 11 के.व्ही.चा वीजप्रवाह घरात सोडून संपूर्ण कुटुंबच विजेच्या जोरदार शॉकने संपविण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. कडेगाव तालुक्यात वांगी येथे मंगळवारी (दि. 3) रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने संपूर्ण कुटुंबीय वाचले.
वांगी येथील स्वातंत्र्यवीर शाहीर शंकरराव निकम यांचा मोठा मुलगा अशोक निकम यांच्या कुटुंबीयांवर हा बाका प्रसंग ओढवला. त्यांचे वांगी गावाच्या उत्तरेस बिरोबाचीवाडी रस्त्यालगत घर आहे. त्यांच्या घराजवळ ट्रान्स्फॉर्मर आहे. उच्च दाबाच्या या ट्रान्स्फॉर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या अशा दोन्ही दारांच्या कोयंड्यांमध्ये वीजप्रवाह सोडला होता. त्यासाठी ट्रान्स्फॉर्मरमधून तारा थेट जोडल्या होत्या. त्यानंतर नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फुटांवरून या जोडलेल्या तारांचे नियंत्रण करायचे आणि ट्रान्स्फॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची, असा कट होता. रात्री दीडच्या सुमारासच संशयितांनी त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्स्फॉर्मरजवळ स्फोट झाला.
मोठ्या आवाजाने आणि आगीमुळे निकम कुटुंबीय जागे झाले आणि त्यांनी दरवाजा उघडला. या स्फोटामुळे ट्रिप होऊन वीजप्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे घराबाहेर पडताना कडी-कोयंड्यांना हात लागूनही कुटुंबीयांना विजेचा धक्का बसला नाही. काही वेळाने वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सूरज निकम यांच्या आईला थोडा शॉक जाणवला. त्यानंतर पुन्हा तारा ट्रिप झाल्या. सावध झालेल्या निकम कुटुंबीयांनी हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा डाव आहे, हे जाणून तातडीने बचावाच्या हालचाली केल्या. यादरम्यान काही लोक तेथे मोठमोठ्याने बोलत असल्याचे आणि पिकाच्या आडोशाने धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र, ते कोण होते, त्याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही.