Sangli News : गणेश विसर्जनादिवशी कृष्णा कोरडी | पुढारी

Sangli News : गणेश विसर्जनादिवशी कृष्णा कोरडी

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगली संस्थानसह घरगुती गणपतीच्या विसर्जनाचा पाचवा दिवस. पण इतक्या महत्त्वाच्या दिवशीच कृष्णा नदी कोरडी ठणठणीत होती. यात भर म्हणजे महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने शेरी नाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी या कोरड्या नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांतून संताप व्यक्त होत होता.

गणेश विसर्जनासाठी हजारो सांगलीकर सरकारी घाटावर येत असतात. पण काही दिवसांपासून नदी कोरडीच आहे. किमान विसर्जनादिवशी तरी नदीत पाणी सोडावे, अशी मागणी होत होती. यानंतर कोयना धरण व्यवस्थापनाने 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग शुक्रवारी सुरू केला खरा, पण शनिवारी संध्याकाळपर्यंत हे पाणी काही सांगलीपर्यंत आले नव्हते. हे पाणी बारा तासात पोहोचेल असा अंदाज गृहीत धरून त्यात शेरीनाला सोडून देण्याचा संतापजनक प्रकार मात्र सांगली महापालिकेने केला. शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णेत मिसळण्यापासून रोखण्यात महापालिकेच्या यंत्रणेला वारंवार अपयश येत असल्याचे दिसत आहे.

बेजबाबदार आमदार

सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगलीचे आराध्य दैवत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी सांगलीत कृष्णा नदीला पाणी नसावे, यासारखी खेदाची गोष्ट नाही. मूर्ती विसर्जनासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न का केले नाहीत? आमदार गाडगीळ यांनी सतर्कता बाळगून जलसंपदा मंत्र्यांशी संपर्क साधून उत्सवासाठी खास बाब म्हणून पाणी सोडायला हवे होते, पण त्यांनी ते केले नाही. यातच शेरीनाल्याचे दूषित पाणी नदीत सोडले जात आहे. भावनेशी चाललेला हा खेळ नागरिक सहन करणार नाहीत.

आज गणेश विसर्जन आहे हे माहीत असतानाही सार्‍याच यंत्रणांकडून बेजबाबदारपणा केला गेला. पाटबंधारे आणि महापालिकेच्या ड्रेनेज विभागाने केलेली बेपर्वाई संतापजनक आहे. किमान गणेश विसर्जनादिवशी तरी नदीत शेरीनाला मिसळणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी होती, पण तीही घेतली गेली नाही.
– संजय चव्हाण विसावा मंडळ अध्यक्ष

गणपती विसर्जनासाठी नदीत पाणी असायलाच हवे. यासाठीच 17 ऑगस्टपासून साटपेवाडी बंधार्‍यातून पाणी सोडा, अशी मागणी करतो आहोत. पण त्याची दखल घेतली नाही. जलसंपदा विभागाच्या बेजबाबदारपणाचा कळस झाला. महापूर जसा मानवनिर्मित आहे, तसा हा प्रसंगही मानवनिर्मितच आहे.
– विजय दिवाण निवृत्त अभियंता

Back to top button