सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील यांचे वडील, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी रामचंद्र कृष्णा पाटील (वय ८८) यांचे आज (सोमवार) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. आर. के. तात्या या टोपण नावाने ते सर्वत्र परिचित होते.
गेल्या कांही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर ठिकठिकाणी उपचार करण्यात आले. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारास साथ देत नव्हते. अखेर आज (सोमवार) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
आर. के. तात्यांनी अनेक वर्षे पोलीस दलात उल्लेखनिय काम केले. उपविभागीय पोलिस अधिकारी पदावरून ते सेवानिवृत्त झाले. खासदार संजय पाटील यांना घडविण्यात तात्यांचा सिंहाचा वाटा होता. आर. के. पाटील यांच्या निधनाने खासदार पाटील कुटुंबियांसह चिंचणी गाव आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दुपारी एक वाजता चिंचणी (ता. तासगाव) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.