अजित पवार यांचे स्वागत सांगली जिल्ह्यात केदारवाडी येथे करणार : वैभव पाटील | पुढारी

अजित पवार यांचे स्वागत सांगली जिल्ह्यात केदारवाडी येथे करणार : वैभव पाटील

विटा : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापुरातील उत्तरदायित्व सभेला आपण उपस्थित राहणार आहे. शिवाय सांगली जिल्ह्यात केदारवाडी (ता. वाळवा) येथे आपण त्यांचे स्वागत करणार आहोत अशी माहिती विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव सदाशिवराव पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर खुद्द शरद पवार आणि अजितदादा यांच्यात पक्ष नेतृत्वाबद्दल स्पर्धा सुरू आहे. त्यातच मोठ्या साहेबांबरोबर कोण आणि धाकट्या साहेबांबरोबर कोण कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यातही शरद पवारांचे खंदे समर्थक आणि खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यात कोण, ठे जाणार याबाबत उत्सुकता होती.

खानापूर विधानसभा मतदारसंघातही मागच्या तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीत डेरे दाखल झालेल्या माजी आमदार सदाशिव राव पाटील यांचा गट नेमकी काय भूमिका घेणार, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू होती. अजितदादा यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर शरद पवार कराड येथे प्रीतीसंगमावर आले असताना माजी आमदार सदाशिवराव पाटील हे त्यांना भेटून समर्थन देण्यासाठी गेले होते. मात्र पुढच्या दोनच दिवसात या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे युवा नेते आणि माजी आमदार पाटील यांचे चिरंजीव वैभव पाटील यांनी अजितदादा पवार गटाच्या मुंबईतील बैठकीस हजेरी लावली होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी सांगलीतील पदाधिकाऱ्यां समवेत अजितदादा पवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी वैभव पाटील यांना जिल्ह्याच्या राजकारणातले मोठे पद देणार, असे अजित दादांनी सांगितल्याचे बोलले जात होते.

आता खुद्द वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या सांगली जिल्ह्यातली स्वागताची तयारी केली आहे. मतदारसंघातील वैभव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमावर आता ‘दादा पर्व’ असे म्हणत “उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी चलो केदारवाडी” असा संदेश पसरवण्यास सुरूवात केली आहे. तसेच साडेचारशेहून अधिक गाड्या घेऊन आपण अजितदादांच्या स्वागतासाठी केदारवाडी येथे जाणार आहोत, असे शहरातील पत्रकारांना आवर्जून फोन करून त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर आता खुद्द माजी आमदार सदाशिवराव पाटील नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button