Maratha reservation | सांगली : मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार वादावादी | पुढारी

Maratha reservation | सांगली : मराठा समाजाच्या बैठकीत जोरदार वादावादी

सांगली : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाच्या मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत जोरदार वादावादी झाली. आंदोलन कोणते, कधी, कसे करायचे यावरून पदाधिकारी व कार्यकर्त्यांत तासभर गोंधळ सुरू होता. शेवटी महिलांनी हस्तक्षेप केल्यानंतर वाद शमला.

जालना प्रकरणाचा निषेध व मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाचा निर्णय घेण्यासाठी समाजातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात झाली. या वेळी अनेकांनी आपली भूमिका मांडणे सुरू केले. प्रत्येकजण त्याच-त्याच त्या प्रकारची भाषणे करीत होता. परिणामी काही कार्यकर्त्यांना संताप अनावर झाला. ही भाषणबाजी बंद करा, नेमके काय आंदोलन करायचे ते सांगा, ठाम भूमिका घ्या, जोरदार आंदोलन करूया, असे काही कार्यकर्त्यांनी निक्षून सांगण्यास सुरुवात केली. याला बोलणारे व खाली बसलेल्यांनी विरोध केला. यामुळे वाद जास्तच वाढला. अनेकांनी जोरदार बोलत भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आल्याचे सांगितले.

काही ज्येष्ठ पदाधिकार्‍यांनी तरुण कार्यकर्त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अनेकांनी घोषणाबाजी केली. काहींनी मोर्चा घ्यावा, काहींनी बंद करावा, असा आग्रह धरला. तासभर हा गोंधळ सुरू होता. या वादाला कंटाळून अनेकजण बैठक सोडून निघून गेले. काही ज्येष्ठांनी सांगूनही कार्यकर्ते ऐकत नसल्याने शेवटी महिलांनी पुढाकार घेवून कार्यकर्त्यांनी निक्षून गप्प बसण्यास सांगितले. त्यामुळे वाद शमला.

Back to top button