सांगली जिल्ह्यात बारा शेतकर्‍यांना एक कोटीचा गंडा | पुढारी

सांगली जिल्ह्यात बारा शेतकर्‍यांना एक कोटीचा गंडा

सांगली/मिरज/तासगाव/इस्लामपूर/आष्टा/शिराळा ः पुढारी वृत्तसेवा :  ऊसतोड मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून मिरज, तासगाव, इस्लामपूर व शिराळा तालुक्यातील बारा शेतकर्‍यांना सुमारे एक कोटीचा गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उजेडात आला. याप्रकरणी 20 ठेकेदारांविरूद्ध संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भोसे (ता. मिरज) येथील बाहुबली बाबासाहेब मालगावे (वय 36) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. गोकूळ उत्तम राठोड (यवतमाळ) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. राठोड याने 2018 मध्ये मालगावे यांना दहा कोयते व 20 मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून पाच लाख 70 हजार रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात त्याने मजूर पुरविले नाहीत.

कळंबी (ता. मिरज) येथील चाँदसाहेब मकबूल सय्यद यांची साडेसात लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. कालसिंग लाखनसिंग भिलालाल, धुमसिंग लाखनसिंग डुडवे व प्रेम लाखनसिंग भिलालाल (बीड) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे. भोसेतील संजय भूपाल चौगुले यांची एक लाखाची फसवणूक झाली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाप्पा सत्याप्पा हिप्परगी, आप्पासाहेब व्यंकाप्पा बेळगली व सिद्रशाय लकाप्पा मादापपोळ (कर्नाटक) या तिघांविरूद्ध गुन्हा नोंद आहे.

तासगाव तालुक्यातील पेड येथील रामचंद्र बापूसाहेब शेंडगे (45) यांची 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पापालाल मथरू चव्हाण (पारद ता, पुसद जी, यवतमाळ), मांगीलाल श्रीराम राठोड (बान्सी ), फारुख इस्माईल शेख (मधूकरनगर ता. पुसद), गोपाळ पांडुरंग गावडे (कारपा ता. मानोरा, जि. वाशीम), प्रल्हाद रावजी कांबळे (माहूर जि. नांदेड) व धरमसिह चंदू पवार (वाई बाजार ता. माहूर जि. नांदेड ) यांच्याविरूद्ध तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

संदीप जनार्दन मोरकटे ( 50, येळावी) यांचीही 12 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. शिवाजी पाटील (पणुंब्रे), राजेंद्र कदम (बिऊर, ता. शिराळा) यांची सहा लाखाची फसवणूक झाली आहे. धनराज उखा नाईक (ढेकू-बुद्रुक, ता. अळमणेर, जि. बेळगाव) याच्याविरूद्ध शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
इस्लामपूर पोलिस ठाण्यात लालू नरसिंह चव्हाण (सोमदर हट्टी, जि. विजापूर), फतु भिल्लू रोठोड (28, हक्कळगी, जि. विजापूर), देविदास तोताराम भिल (रूदावली, जि. धुळे), संतोष लालू चव्हाण (कुमटगी, जि. विजापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांनी सुभाष नांगरे, उत्तम हुबाले (हूबालवाडी), धनाजी मोकाशी (नवेखेड) यांची 36 लाखांची फसवणूक केली.

शेतकर्‍यांना फसविण्याची मालिकाच!

गेल्या पाच वर्षांपासून ऊस उत्पादन शेतकर्‍यांना अशाप्रकारे फसवविण्याची मालिकाच सुरू आहे. जिल्ह्यात 25 पोलिस ठाण्यात ठेकेदारांविरूद्ध गुन्हे दाखल आहेत. मात्र या गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. परिणामी फसवणुकीचे प्रकार वाढतच आहेत.

आष्टा येथे 19 लाखांची फसवणूक

दोघा ऊस वाहतूकदारांची 19 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील दोन मुकादमांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पांडुरंग आनंदा शिसाळे (58, रा. नागाव, ता.वाळवा) व गणपती कृष्णा खोत (वय 43,रा.गाताडवाडी, ता.वाळवा) यांनी आष्टा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सागर दत्तु गोडसे व कोंडीबा हनुमंत गोडसे (वय 34, दोघेही रा.शिंगोर्णी, ता. माळशिरस, जि.सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या मुकादमांची नावे आहेत.

Back to top button