

जत; पुढारी वृत्तसेवा : MSRTC employee strike : एस. टी.च्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या विभागात विलीनीकरण करावे. शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी सवलती, वेतन भत्ते लागू करावेत व इतर मागण्या मान्य कराव्यात म्हणून एसटी कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला आहे. गुरुवारी दिवसभर जत आगारातील सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द झाल्या. आगारात शुकशुकाट होता. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
या बेमुदत संपात कामगार संघटनेचे विलास शिंदे, हिराचंद व्हनमाने, यूवराज शिवशरण, अमित सुतार, लाला सुर्वे, राजकुमार व्हनमाने, शरद जमदाडे, पांडुरंग खरात यांच्यासह सर्व कामगारांनी सहभाग नोंदवला.
एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या असून शासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत जत एसटी आगारातील चालक-वाहक व इतर कामगारांनी आगारप्रमुख डी. एम. घुगरे यांना निवेदन दिले होते. आमदार गोपीचंद पडळकर, एस.टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी पुकारलेल्या संपाच्या नोटीस नुसार कर्मचारी सहभागी झाले आहे.
गुरुवारी बेमुदत संपाच्या ठिकाणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी भेट घेऊन कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तर भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप, नगरसेवक विजय ताड, रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, भाजपा नेते प्रभाकर जाधव, माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत, नगरसेवक मिथुन भिसे, सूरज सगरे, किरण सगरे, शिवा माळी, सुरेश भिसे, नारायण कदम आदींनी संपाच्या ठिकाणी भेट देऊन पाठींबा दिला.
आगार प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमदार गोपीचंद पडळकर व महाराष्ट्राचे कनिष्ठ वेतन श्रेणी एस.टी. कामगार संघटनेचे अजयकुमार गुजर यांनी एस.टी. महामंडळ राज्य शासनाकडे विलीनीकरनासाठी पुकारलेल्या संपाच्या नोटीस नुसार कर्मचारी सहभागी होत आहेत. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासनाच्या इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी तटपुंजे वेतन देत आहे. यामुळे एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. अदा केलेल्या पगारातून मूलभूत गरजा भागविणेसुद्धा कठीण झाल्याने कर्मचारी कर्जबाजारी झालेले आहेत. त्यामुळे नैराश्याने राज्यात जवळपास ३२ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या सारखे गंभीर पाऊल उचलले आहे.ही संख्या आणखी वाढत आहे.
तसेच राज्यातील इतर अनेक एसटी आगारांमध्ये कर्मचारी संपावर आहेत. संप असलेल्या आगारात एसटी गेली की या ठिकाणी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून कर्तव्यात असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अपमानास्पद बोलणे व शिवीगाळ केली जाते. यामुळे कर्तव्यावर असणाऱ्यांची मानसिकता बिघडते. यासाठी वरील सर्व प्रकार टाळण्यासाठी वेतन भत्ते व इतर सवलती लागू करून त्वरित देण्यात याव्यात. याकरता आम्ही सर्व कर्मचारी आजपासून संपात सहभागी होत असल्याचे म्हटले आहे. निवेदनावर एकूण शंभराहून अधिक कर्मचाऱ्यांच्या सह्या आहेत.
एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन गुरुवारपासून बेमुदत सुरू झाल्याने बसच्या सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान आगारप्रमुख यांनी कर्मचाऱ्यांशी संप माघार घ्यावा यावर चर्चा केली परंतु चर्चा निष्फळ ठरली. जत आगाराच्या 170 फेऱ्या दिवसभरातील रद्द झाल्या असून सुमारे आठ लाख इतका तोटा आगाराला झाला आहे व फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे.