विटा : सुलतानगादे येथील अपघातात सोलापूर जिल्ह्यातील तरुण ठार | पुढारी

विटा : सुलतानगादे येथील अपघातात सोलापूर जिल्ह्यातील तरुण ठार

विटा ; पुढारी वृत्तसेवा : विजापूर ते गुहागर राज्य महामार्गावर एसटी आणि स्विफ्ट गाडी यांच्यात झालेल्या अपघातात सोलापूर जिल्ह्यातील तरुणाचा मृत्यू झाला. रमेश निवृत्ती बनकर (वय ३६, रा. वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव असून त्याची पत्नी आणि दोन चिमुकली मुले गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात बुधवारी (दि.३) सायंकाळी चारच्या दरम्यान सुलतानगादे (ता.खानापूर) येथे घडला. याप्रकरणी एसटी चालक भैरू कांबळे याला विटा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सायंकाळी चारच्या सुमारास इस्लामपूर आगाराची पंढरपूर ते इस्लामपूर (एम एच ०७-सी-९१७८) ही गाडी विट्याकडे येत होती. याच दरम्यान वेळापूर येथील रमेश बनकर हे आपल्या गाडीने भिवघाट मार्गे आपल्या गावी निघाले होते. मात्र येथे दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली, यात स्विफ्ट चालवत असणारे रमेश यांना जबर तडाखा बसला. त्यांच्या डोक्याला आणि छातीलाही जोरात मार लागला. तसेच गाडीत असणाऱ्या पत्नी साधना ( वय ३० ), मुलगी सानवी ( वय ७ ) आणि मुलगा सिद्धेश ( वय ४ ) हेही जखमी झाले.

दरम्यान, या अपघातानंतर या चारही जणांना भिवघाट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने रमेश बनकर यांचा यात मृत्यू झाला आहे. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच एसटीच्या उजव्या बाजूला धडक बसल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे..

Back to top button