सांगली : ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्‍यास उग्र आंदोलन’ | पुढारी

सांगली : 'एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्‍यास उग्र आंदोलन'

आटपाडी ; पुढारी वृत्तसेवा

एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या बेमुदत आंदोलनाबाबत विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील एकाही एसटी कर्मचाऱ्यावर कारवाई करु नये आणि त्यांच्याशी चर्चा करुन मागण्यांचा योग्य विचार करावा अशी विनंती केली. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा त्‍यांनी यावेळी दिला.

दरम्यान आटपाडी एसटीच्या चालक, वाहक आणि कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आटपाडी आगारातून सलग चौथ्या दिवशी एकही एसटी सुटली नाही. कर्मचारी आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत शनिवारी आगाराच्या गेटला कुलूप लावण्यात आले होते. या प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

परंतु आगारातील सर्व कर्मचारी आगाराच्या दारात ठिय्या देऊन बसले आहेत. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी पदमा कदम आणि पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांनी आंदोलक, आगार प्रमुख कदम यांच्याशी चर्चा केली. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.

Back to top button