सांगली : बोगस कागदपत्राच्या आधारे सिमकार्ड विक्री, चौघांवर गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : बोगस कागदपत्राच्या आधारे सिमकार्ड विक्री, चौघांवर गुन्हा दाखल

जत, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील सिमकार्ड विक्रीधारकांनी ४ पिओसी कोडवरून जाणीवपूर्वक हेतूने बोगस कागदपत्राच्या आधारे एका कंपनीचे सिम कार्ड वितरित करणाऱ्या दोघांवर जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यात उमराणी येथील ३ पीओशी कोडधारकाने ३८८ इतके सिमकार्ड बोगस कागदपत्राच्या आधारे विक्री केले आहे. तर शहरातील मंगळवार पेठेतील तेली गल्ली येथील पीओशी कोडधारकाने तब्बल १२२ बोगस सिम कार्ड वितरित केल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित विभागाने जत पोलिसाकडे सदरचा गुन्हा वर्ग केला आहे. याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीशैल वळसंग यांनी जत पोलिसात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, राज्यात बोगस सिमकार्डची पडताळणी चालू आहे. राज्यात १ हजार ६६४ बोगस सिम कार्ड असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील तब्बल ५१० बोगस सिमकार्ड जत तालुक्यातील असल्याचे पडताळणीतून समोर आले आहे. याबाबत दूरसंचार विभागाने तशी माहिती पोलीस विभागाकडे दिली आहे. यावरून पोलिसांनी संबंधित कार्डविक्रेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले आहे.

शहरातील मंगळवार पेठ येथे एक मोबाईल दुकान विक्रेता सिमकार्ड विक्री करत होता. यात एका कोडवर तब्बल १२२ कार्डधारकांचे बोगस कागदपत्रे सादर केली असल्याचे दिसून आले आहेत. यामध्ये संबंधित विभागाची कार्ड विक्रेतेने स्वतःच्या फायद्याकरीता फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. तर तसेच उमराणी येथील एका कार्ड विक्रेत्यांनी ३ पोओसी कोड वरून तब्बल ३८८ कार्ड वेगवेगळ्या नावाने विक्री केल्याचे दिसून आले आहे. यामुळे तालुक्यात बोगस कार्डांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस याबाबत सतर्क झाले असून कसून चौकशी करत आहेत. या घटनेचा अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

बोगस कागदपत्राच्या आधारे सिम कार्ड विक्री करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. बनावट व बोगस कागदपत्र दाखल करून फसवणूक केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. भविष्यात असे कृत्य करणाऱ्या वर तात्काळ गुन्हे दाखल होतील. याबाबत सायबर क्राईम अधिक सतर्क आहे.
– पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे

हेही वाचलंत का?

Back to top button