सांगली : कुपोषित बालकांची संख्या निम्म्याने घटली | पुढारी

सांगली : कुपोषित बालकांची संख्या निम्म्याने घटली

संजय खंबाळे

सांगली : जिल्ह्यात मार्च 2021 च्या तुलनेत जूनच्या अहवालानुसार कुपोषित बालकांची संख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, मिरज, वाळवा कवठेमहांकाळ तालुक्यांत कुपोषितचे प्रमाण जास्त दिसत आहे. जिल्ह्यात अजूनही काही बालके कुपोषित असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा राबत आहे. दरवर्षी कमी – अधिक प्रमाणात जिल्ह्यात कुपोषित बालके आढळून येत आहेत. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे. मात्र, याबाबत म्हणावे तसे जागृत नसल्याने कुपोषितांचे प्रमाण कमी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने कुपोषण रोखण्यासाठी यंत्रणा राबते. दर महिन्याला अंगणवाडीमध्ये शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालकांची तपासणी केली जाते. वयाप्रमाणे वजन, उंचीनुसार वजन यावरून कुपोषणाचे वर्गवारी केली जाते. यामध्ये सॅम म्हणजे तीव्र आणि मॅम म्हणजे मध्यम असे कुपोषितचे वर्गीकरण केले जाते. सॅम वर्गवारीत येणार्‍या बालकांना मृत्यूचा धोका असतो. त्यामुळे तीव्र वर्गातील बालकांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. तीव्र म्हणजेच तुकड्या बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गावात ग्राम बाल विकास केंद्र स्थापन केली आहेत. अंगणवाडीच्या मतदीने 90 दिवस या बालकांना पौष्टिक आहार दिला जातो.

एकात्मिक बाल विकास सेवा 2021 च्या अहवालानुसार शून्य ते पाच वर्षे वयोगटातील जिल्ह्यात 1 लाख 51 हजार 821 बालकांची संख्या होती. त्यातील 1 लाख 50 हजार 956 जणांचे वजन करण्यात आले. त्यापैकी 1 लाख 44 हजार 882 बालके सर्वसाधारण होती. 5 हजार 542 कमी तर 532 तीव्र कमी वजनाची होती. तसेच जून 2023 च्या अहवालानुसार शून्य ते पाच वर्षे वयोगटातील 1 लाख 25 हजार 33 बालके आहेत. यातील 1 लाख 25 हजार 21 बालकांचे वजन घेतले आहे. त्यापैकी 1 लाख 21 हजार 871 बालके सर्वसाधारण श्रेणीत आहेत. तसेच 2 हजार 835 कमी तर 315 बालके तीव्र कमी वजनाची आहेत. 2021 च्या तुलनेत यंदा कमी वजनाची बालकांची संख्या 2 हजार 707 तर तीव्र वजन कमीची संख्या 217 आहे.

कुपोषितची कारणे

विशेष म्हणजे, सधन कुटुंबातील काही बालके कुपोषित आढळून आली आहेत. त्यामुळे केवळ गरीब कुटुंबात बालके कुपोषित असतात हा गैरसमज लोकांनी दूर केला पाहिजे. गर्भधारणेवेळी आहारात आवश्यक घटकांचा अभाव, आहाराकडे दुर्लक्ष, बाळाला तापासह इतर किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष अशी कुपोषितची कारणे आहेत.

काय आवश्यक

गर्भधारणेवेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पोषण आहार घेणे आवश्यक आहे. बाळ जन्मानंतर पहिली सहा महिने स्तनपान करणे गरजेचे आहे. सहा महिन्यांनंतर स्तनपानाबरोबरच घरी शिजविलेला ताजा पूरक आहार घेण्याची गरज आहे. तसेच आवश्यकतेनुसार कॅल्शियमच्या गोळ्या घेणे, वेळोवळी हिमोग्लोबीन तपासणी करणे गरजेचे आहे.

Back to top button