जयंत पाटील- अजित पवार समर्थकांत धुमश्चक्री | पुढारी

जयंत पाटील- अजित पवार समर्थकांत धुमश्चक्री

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या महासभेत मिरजेतील दुबार कामांवरून राष्ट्रवादीच्या जयंत पाटील गटाच्या नगरसेविका संगीता हारगे व उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातील वाद टोकाला गेला. जयंत पाटील यांच्याकडून दबाव आणला जात असल्याचा उल्लेख थोरात यांनी केल्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान संतापले. ते कंबरेचा पट्टा काढून थोरात यांच्या अंगावर धावले. थोरात यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. जोरात धुमश्चक्री उडाली. काँग्रेस व भाजप नगरसेवकांनी त्यांना रोखले अन्यथा मोठी हाणामारी घडली असती. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी हारगे व थोरात यांचे सभा संपेपर्यंत निलंबन केले. त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सभा सुरू झाली.

महापालिकेत शुक्रवारी महासभा झाली. अध्यक्षस्थानी दिग्विजय सूर्यवंशी होते. उपमहापौर उमेश पाटील, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसचिव चंद्रकांत आडके तसेच नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते. मिरजेतील प्रभाग क्रमांक वीसमधील कामांवरून हारगे यांनी प्रश्न उपस्थित केला. हारगे यांनी सूचवलेले रस्त्याचे काम रस्त्याचा दर्जा चांगला असल्यावरून रद्द केले, पण त्याच रस्त्याचे काम थोरात यांनी सूचवल्यानंतर मंजूर केले. निविदा प्रक्रिया सुरू केली असल्याकडे लक्ष वेधत हारगे प्रशासनावर भडकल्या. ख्वाजा वस्ती रस्त्याची जागा महापालिकेच्या नावे होण्यापूर्वीच रस्त्याचे काम मंजूर केल्यावरूनही हारगे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. प्रशासनाकडून उत्तर देण्याचा प्रयत्न झाला. तेवढ्यात हारगे व थोरात यांच्यात जोरात वादावादी सुरू झाली. दरम्यान दुबार काम रद्द केल्याचे तसेच ख्वाजा वस्तीमधील रस्त्यावर आजच महापालिकेचे नाव लागल्याचे थोरात यांनी सांगितले.

वाद सुरू असताना थोरात यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव घेतले. जयंत पाटील हे हारगे यांच्यासाठी प्रशासनावर दबाव आणतात, असे थोरात यांनी म्हटल्याकडे लक्ष वेधत राष्ट्रवादीचे गटनेते बागवान संतप्त झाले. थोरात यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने, जमील बागवान, संगीता हारगे यांनीही बागवान यांना साथ देत थोरात यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे नगरसेवक महापौर यांच्या डायससमोरील रिकाम्या जागेत धावले. थोरात हेही तिथे पोहोचले. माफी मागण्याचा प्रश्नच नसल्याचा पवित्रा घेतला. त्यातून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. थोरात विरूध्द जयंत पाटील समर्थक असा सामना रंगला. कंबरेचा पट्टा काढत बागवान हे थोरात यांच्या अंगावर धावून गेले. बागवान यांचे ज्येष्ठ बंधू नगरसेवक जमील बागवान हेही थोरात यांच्या अंगावर धावून गेले.

दरम्यान महापौर सूर्यवंशी यांच्यासह भाजपच्या गटनेत्या व सभागृह नेत्या भारती दिगडे, स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे व भाजप, काँग्रेस नगरसेवकांनी वाद मिटवला. दरम्यान सभेतील चर्चेत व्यक्तीगत वाद उपस्थित करत सभेत अडथळा आणल्यावरून महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी हारगे व थोरात यांचे सभा संपेपर्यंत निलंबन केले. सभागृहातून बाहेर जाण्याचे आदेश दिले. थोरात यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलेले विधान सभा कामकाजातून वगळण्याचे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी प्रशासनाला दिले. त्यानंतर सभेचे कामकाज सुरळीत सुरु झाले.

मागासवर्गीय असल्याने मी टार्गेट : थोरात

मी जनतेच्या हिताची कामे करत आहे. कोणाच्या आडवे जाण्याचा माझा स्वभाव नाही. मात्र माझ्या विकासकामांच्या आडवे सर्वजण येतात. मी मागासवर्गीय आहे. त्यामुळे मला प्रभागातील सहकारी नगरसेवक टार्गेट करीत आहेत. मला जाणीपूर्वक त्रास दिला जात आहे, अशी भावना योगेंद्र थोरात यांनी सभेत व्यक्त केली.

खोट्या अ‍ॅट्रॉसिटीने ब्लॅकमेल : हारगे

संगीता हारगे म्हणाल्या, योगेंद्र थोरात हे अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करायला लावतात. आमचे संपूर्ण कुटुंब यात त्रस्त झाले आहे. कर्मचारी, अधिकारी यांना अ‍ॅट्रॉसिटीची धमकी देत बेकायदेशीर कामांसाठी ते दबाव टाकत असतात. त्यांच्या ब्लॅकमेलिंगमुळे प्रशासन त्रस्त झाले आहे.

Back to top button