सांगली : कडेगावात मोहरमची भावपूर्ण वातावरणात सांगता; जियारात होऊन ताबूतांचे विसर्जन | पुढारी

सांगली : कडेगावात मोहरमची भावपूर्ण वातावरणात सांगता; जियारात होऊन ताबूतांचे विसर्जन

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा: कडेगाव शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक मोहरम ताबुतांचे जियारत होवून आज (दि.३१) विसर्जन करण्यात आले. ऐतिहासिक मोहरम ताबुतांची सांगता अत्यंत भावपूर्ण वातवरणात झाली. यावेळी प्रारंभी मोहरम कमिटी आणि नागरिकांची बैठक संपन्न झाली. यामध्ये पुढील वर्षी पावसाचे वातावरण बघून ताबुतांचे बांधकाम मजबूत करणे आणि कळसाची उंची यावर्षी प्रमाणे मर्यादित ठेवावी व मोहरममधील मेल व कर्बल यांचे अधिक योग्य पद्धतीने नियोजन करून हिंदू-मुस्लिम ऐक्याची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ताबुतांच्या भेटी नंतर तिसऱ्या दिवशी जियारतीचा कार्यक्रम असतो. यावेळी मानाच्या सातभाई ताबूताजवळ ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत मोहरममधील विविध विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. मोहरमला ज्या लोकांनी सहकार्य केले, त्यांचे आभार मानण्यात आले. पुढील वर्षी आणखी उत्साहात मिरवणुका व भेटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. फातेहा झाल्यानंतर तबर्रूक (प्रसाद) म्हणून फळे व खजूर वाटप करण्यात आले. ताबुतांचे विसर्जन म्हणजे ताबुतांचे मजले वेगवेगळे करून ठेवण्यात आले.

यावेळी १४ ताबूतांचे मालक, मानकरी, प्रतिष्ठीत मान्यवर, करबलवाले, बुधवार पेठ मेलवाले, शुक्रवार पेठ मेलवाले आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button