सांगली : जिल्ह्यात अनेक लॅबोरेटरिज् अनधिकृत | पुढारी

सांगली : जिल्ह्यात अनेक लॅबोरेटरिज् अनधिकृत

गणेश मानस

सांगली :  सांगलीतील एका डॉक्टरने आपल्या रुग्णाला रक्तातील साखर तपासण्यासाठी सांगलीतील मान्यवर चार लॅबमध्ये पाठवले. चारीही लॅबचा तपासणी अहवाल वेगवेगळा आल्याचे संबंधित डॉक्टरने जाहीर केले. वास्तविक पाहता जिल्ह्यात अनेक लॅबनी अधिकृतपणे नोंदणी केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अशा अनधिकृत लॅबवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

एखादा रुग्ण हॉस्पिटलला गेला की, त्याची अगोदर वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी लॅबमध्ये पाठवले जाते. लॅबची चिठ्ठी देताना हॉस्पिटलशी ‘लागेबांधे’ असणार्‍याकडूनच तपासणी करण्याची हॉस्पिटलकडून सक्ती केली जाते. त्यामध्ये हॉस्पिटलचाही ‘वाटा’ असतो. यामध्ये अनावश्यक चाचण्यांचा भरणा असतो. जिल्ह्यात अनेक लॅब हे विनानोंदणीचे असल्याचे दिसून आले आहे. या क्षेत्रातले शिक्षण पूर्ण नसताना जिल्ह्यात लॅब काढण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी टेक्निशिअनला नोकरीवर ठेवले जाते. काही टेक्निशिअनना रुग्णांच्या घरी पाठवून रक्त गोळा केले जाते. त्यानंतर लॅबमधील यंत्रावरच रक्ताची तपासणी केली जाते. हे सर्व अहवाल ऑनलाईन असतात. त्याच्यावर सही करण्यासाठी एमडी पॅथॉलॉजीस्टची नेमणूक केली जाते. प्रत्येक रिपोर्टनुसार एमडीला कमीशन ठरलेले असते. दिवसभरात मोठ्याप्रमाणात रिपोर्ट एमडीकडे आलेले असतात. ते तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्यासाठी एमडीला वेळ कुठे असतो. त्यामुळे प्रत्येक रिपोर्टवर सही केली जाते. केवळ टेक्निशिअनच्या भरवशावर रक्ताची तपासणी करण्यात येते. त्यामुळे हा अहवाल किती ग्राह्य धरायचा हा प्रश्न असतो. परंतु रुग्णांकडून पैसे काढण्यासाठी ही यंत्रणा उभी आहे.

Back to top button