सांगली : बाप रे… सॅम्पल एकच..लॅब चार, रिपोर्ट चार वेगवेगळे !

सांगली : बाप रे… सॅम्पल एकच..लॅब चार, रिपोर्ट चार वेगवेगळे !
Published on
Updated on

सांगली : एका व्हायरल व्हिडीओने लॅबोरेटरींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका रुग्णाच्या रॅण्डम ब्लड शुगरचे चार वेगवेगळ्या लॅबचे रिपोर्ट वेगवेगळे आले आहेत. रॅण्डम ब्लड शुगर 126 पासून 421 पर्यंत आली. रिपोर्टमधील प्रचंड तफावत विचार करायला लावणारी आहे. या व्हायरल व्हिडीओवरून लॅबोरेटरींच्या क्वालिटी कंट्रोलचा मुद्दा उपस्थित होत आहे. याप्रकरणी वस्तुनिष्ठ माहिती लोकांसमोर येणे आवश्यक आहे.

सांगलीतील डॉ. योगेश माईणकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मधुमेह असलेली एक व्यक्ती या डॉक्टरांकडे उपचार घेत होती. ती ब्लड शुगरची तपासणी नियमितपणे करत होती. रिपोर्टमधील ब्लड शुगर कधी कमी, तर कधी जास्त येत होती. त्यामुळे या डॉक्टरास ब्लड शुगर तपासणी रिपोर्टबाबतचा संशय आला. त्यांनी त्याची खात्री करण्याचे ठरवले. त्यासाठी संबंधित रुग्णाचे रक्त एका सिरिंजमध्ये घेतले व लहान चार बाटल्यामध्ये ठेवले. या चार बाटल्या शहरातील चार वेगवेगळ्या लॅबकडे तपासणीसाठी पाठवल्या.

चार लॅबोरेटरींचा रिपोर्ट 15 एप्रिल 2023 रोजी आला. एका लॅबची रॅण्डम प्लाझमा ग्लुकोज 126 इतकी आली. अन्य एका लॅबची रॅण्डम ब्लड शुगर 300 आली. अन्य दोन लॅबची रॅण्डम ब्लड शुगर 390 तसेच 421 इतकी आली. चार लॅबचे चार वेगवेगळे रिपोर्ट आले. ब्लड शुगरमध्ये 126 पासून 421 पर्यंत तफावत आढळली. कोणत्या लॅबचा रिपोर्ट ग्राह्य धरावा व कोणत्या रिपोर्टनुसार उपचार करावेत, असा प्रश्न कोणत्याही डॉक्टरला पडेल, याकडेही डॉ. माईणकर यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान, त्यातून लॅबोरेटरींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लॅबमधून दररोज अनेक प्रकारच्या अनेक चाचण्या होत असतात. यानिमित्ताने या सर्व चाचण्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेने लॅबोरेटरींमधील तपासण्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

चार पॅथॉलॉजी लॅबची चौकशी; अंतरिम अहवाल शासनाला

ब्लड शुगरसंदर्भात व्हायरल व्हिडीओवरून बुधवारी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित झाला. यासंदर्भात शासनाच्या आदेशानुसार चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. कोल्हापूर विभागीय आरोग्य उपसंचालक प्रेमचंद कांबळे हे या समितीचे अध्यक्ष, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम हे सदस्य सचिव आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी तसेच मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील दोन तज्ज्ञ डॉक्टरांचा या समितीत समावेश आहे. या समितीने चार पॅथॉलॉजी लॅबना भेट देऊन चौकशी केली. चौकशी अहवाल आरोग्य संचालनालयाच्या आयुक्तांना सादर केला आहे. दरम्यान, या चौकशीत आढळून आलेल्या बाबींबाबत विचारले असता अहवाल गोपनीय असून शासनाला सादर केला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी सांगितले.

सॅम्पल कलेक्शन, स्टोअरेजपासून ते प्रत्यक्ष तपासणीपर्यंत अनेक बाबी रिपोर्टवर परिणाम करणार्‍या आहेत. या सार्‍या बाबींवर पॅथॉलॉजिस्टचे लक्ष असणे महत्वाचे असते. तपासणीमध्ये क्वालिटी कंट्रोल ही बाब अतिशय महत्वाची आहे. तपासणीसाठी वापरले जाणारे रिएजंट किती दर्जाचे आहेत यापासून ते रिएजंटची रोजच्या रोज तपासणी, त्यांचे रोजच्या रोज स्टँडर्ड मेंटन करणे आवश्यक असते. लॅबमधील टेक्निशियन तज्ज्ञ, प्रशिक्षित, अनुभवी असणेही महत्वाचे आहे.
-डॉ. धैर्यशील साळुंखे, एम.डी. (पॅथॉलॉजी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news