सांगली : संभाव्य भूस्खलन भागाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी | पुढारी

सांगली : संभाव्य भूस्खलन भागाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समवेत तालुक्यातील मणदूरपैकी मिरुखेवाडी व आरळापैकी कोकणेवाडी येथील अतिवृष्टी व भूस्खलन भागाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांना पावसाळ्यात सुरक्षिततेचा उपाय म्हणून दोन सॅटेलाईट फोनसह एनडीआरएफच्या जवानांकडून ट्रेनिंग देण्याचे काम सुरू करण्यात आले.

पावसाळ्यातील भूस्खलनाचा धोका टाळण्यासाठी व येथील लोकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याबाबत तसेच आपत्कालीन साहित्य पुरविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांच्या उपस्थितीत दोन्ही गावात बैठक घेण्यात आली. यावेळी येथील परिस्थिती व संभाव्य धोक्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरुखेवाडी येथे दूरध्वनीची सुविधा नसल्याने पावसाळी आपत्कालीन व्यवस्था म्हणून सॅटेलाईट फोनचे 2 संच तत्काळ देण्यात येणार आहेत.

डॉ. दयानिधी म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून साहित्य मागवून घ्यावे. पुनर्वसनकरीता जागेचा विचार करू आणि समन्वयातून निर्णय घेऊ. कोकणवाडीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करून द्यावा तसेच हे गाव भूस्खलन मध्ये येते असा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे पुनर्वसन किंवा कायम स्थलांतरित करताना खासगी लोकांना त्यांच्या जागेची योग्य किंमत देऊन ती जागा घेता येते का पाहू, असे ते म्हणाले.

माजीमंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, येथील लोकांचे तातडीने पुनर्वसन शक्य नाही. त्यामुळे तात्पुरते स्थलांतर करून शेजारी गावठाण वाढवणे किंवा विशिष्ट कारणासाठी विशेष बाब म्हणून स्थलांतर करावे. लोकसहभाग आणि ग्रामीण विकास योजनेतून वाढीव गावठाण होते का याबाबत निर्णय घेतला जावा. येथील लोकांची जनावरे, शेती जाग्यावरच आहे त्यामुळे शेजारीच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. सत्यजित देशमुख म्हणाले, खुंदलापूर धनगरवाडा गावातील लोकांनी सामूहिक निर्णय घेऊन स्थलांतर न होण्याचा निर्णय घेतला आहे. मणदूरसह डोंगर कपार्‍यामध्ये असणार्‍या सर्वच गावांना वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात धोका आहे. त्यामुळे तात्पुरता स्थलांतराचा निर्णय घ्यावा.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक, माजी जि. प. सदस्य सत्यजित देशमुख, वन संरक्षक अधिकारी नीता घट्टे, अजित साजणे, पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोटे, उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार श्यामल खोत-पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, विराज नाईक, हणमंत पाटील उपस्थित होते.

Back to top button