सांगली : जिल्ह्यात संततधार, वारणेची पातळी वाढली | पुढारी

सांगली : जिल्ह्यात संततधार, वारणेची पातळी वाढली

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  दीड महिन्यापासून दडी मारलेला पाऊस मंगळवारी सांगली-मिरजेत बरसला. जिल्ह्यात इतर ठिकाणीही पावसाची रिपरिप सुरूच राहिली. शिराळ्यात तुरळक पावसाने हजेरी लावली.

येत्या चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. जोरदारऐवजी संततधार तरी कोसळत आहे. शहरामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून थांबून, थांबून पावसाच्या सरी बरसत राहिल्या. सांगली-मिरजेत दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. संततधार पावसाने अनेक रस्त्यांशेजारी पाणी साचून राहिले.

जत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी या दुष्काळी तालुक्यातही पावसाची दिवसभर रिपरिप राहिली. पावसाचे आगार समजल्या जाणार्‍या शिराळा तालुक्यात मात्र पावसाने पाठ फिरवली. याठिकाणी तुरळक पाऊस बरसला. इस्लामपूर, कडेगाव, पलूस तालुक्याही दिवसभर पावसाची रिपरीप सुरूच राहिली. शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

पलूस : तालुक्यात मंगळवारी पहाटेपासून दिवसभर पाऊस सुरू आहे. या पावसामुळे भात, सोयाबीन, भुईमूग, ऊस शेतीसाठी शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. तालुक्यात एक जुन पासून आतापर्यंत 59.1 मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीच्या 53 टक्के पाऊस झाला.
इस्लामपूर : वाळवा तालुक्यात मंगळवारी दिवसभर हलक्या सरी पडत होत्या. पावसाने सुरूवात केल्याने शेतकर्‍यांची टोकणी-पेरणीची लगबग सुरू झाली आहे. खरीपाच्या तोंडावर पावसाने दडी मारल्याने तालुक्यात फक्त 25 ते 30 टक्के टोकणी-पेरणीची कामे झाली आहेत. जुलैच्या मध्यापर्यंत तालुक्यात सरासरीच्या केवळ 17 टक्केच पाऊस झाला आहे. बंधारे, पाझर तलाव कोरडे आहेत. विहिरी, कुपनलिकांची पातळी खालावली आहे. सोमवारपासून तालुक्यात हलका पाऊस सुरू झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू होता. रेठरेधरण, ऐतवडे खुर्द, कुरळप, येलूर, नेर्ले, कापूसखेड, कासेगाव, बोरगाव, वाळवा, इस्लामपूर, कामेरी आदी परिसरात दिवसभर पाऊस होता.
कोकरुड : शिराळा पश्चिम भागात उशिरा का होईना चांगल्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वारणा नदीच्या पातळीत वाढ होत असून मंगळवारी दुपारी कोकरूड-रेठरे वारणा हा बंधारा पाण्याखाली गेला. पावसामुळे ओढे, नाले प्रवाहित झाले आहेत. कोकरूड-रेठरे वारणा बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधार्‍याहून नदीचे पाणी वाहू लागल्याने शाहुवाडी व पन्हाळा तालुक्यातील रेठरे, वारणा, कोेडोली, मालेवाडी, जोंधळेवाडी या गावांना जाणारी वाहतूक बंद झाली आहे. कोकरुडला कामासाठी येणार्‍या नागरिकांना तुरुकवाडी (ता. शाहूवाडी) मार्गे यावे लागत आहे.
मांगले : चांदोली धरण व वारणा नदी पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरु आहे. जुलै निम्मा झाला तरी पावसाचे आगर असलेल्या शिराळा तालुक्यात मान्सून पावसाने समाधानकारक हजेरी लावलेली नाही. दोन दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात तसेच वारणा नदी पाणलोट क्षेत्रात सतत पावसाच्या सरी कोसळत आहे.

Back to top button